उमेदवारांनी सहकुटुंब येऊन बजावला मतदानाचा हक्क
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे
वाई- खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी ६७% ५८ टक्के मतदान झाले. दुर्गम कांदाटी खोर्यात मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम व व्ही. व्ही. पॅट मशीन घेऊन पोलीस बंदोबस्तात वाई मध्ये आणली जात होती.आज सकाळपासून मतदार संघातील ४७१ मतदान केंद्रावर ३६८७ कर्मचार्यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरू झाली.
ग्रामीण भागासह शहरातील बहुतेक केंद्रांवर 6 ची वेळ संपल्या नंतरही मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. सकाळी 11 वाजेपर्यंत मतदारांचा ओघ मतदान केंद्रावर दिसत होता. अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी 1 वाजेपर्यंत ३४. ४२ टक्के मतदान झाले होते. दुपारी 3 पर्यंत मतदारांचा ओघ कमी झाला होता ३ पर्यंत ४८.१९ टक्के मतदान झाले. दुपारी 4 नंतर मात्र पुन्हा मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
जेष्ठ नागरिकांसह दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला. दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र वाहन व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. दुर्गम कांदाटी खोर्यातील सर्वच्या सर्व मतदान केंद्रावर आज निर्विघ्नपणे मतदान प्रक्रिया पार पडली. याठिकाणची वायरलेस व जीपीएस यंत्रणा सुरळीत असल्याने मतदान प्रक्रियेची माहिती सहजपणे निवडणूक अधिकारी यांच्याकडे उपलब्ध होत होती.
सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजेपर्यंत १८.५५ टक्के मतदान झाले. एकुण ६४ हजार ३९३ मतदारांनी मतदान केले. दुपारी १ वाजेपर्यंत ३४. ४२ टक्के मतदान झाले. एकुण १ लाख १९ हजार ४५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.१९ टक्के मतदान झाले. एकुण १ लाख ६७ हजार २५४ मतदारांनी मतदान केले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.२९ टक्के मतदान झाले. यावेळी २ लाख १२ हजार ७४० मतदारांनी मतदान केले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रात उपस्थित होते. त्यांचे मतदान उशीरापर्यंत सुरू असल्याने नक्की आकडेवारी समजू शकली नाही. तरी ६७ .. ५८ टक्के मतदान झाले झाले आहे.
वृध्द, दिव्यांग व्यक्तींसाठी मतदान केंद्रापर्यंत नेण्या आणण्याची सोय करण्यात आली होती. अनेक वृध्दांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वाई तालुक्यात मतदानकेंद्रांना आ. मकरंद पाटील, सौ. अरुणादेवी पिसाळ, यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच इतर उमेदवारांनीही भेटी दिल्या.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकामी निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा वाईचे तहसिलदार सोनाली मेटकरी, महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील, खंडाळाचे तहसिलदार अजित पाटील व निवडणुकी साठी नेमण्यात आलेल्या सर्वच सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
डीवायएसपी बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली तीन्ही तालुक्यांमध्ये मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी . भुईंजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, वाईचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, बिपीन चव्हाण यांनी वाई शहर व तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देवून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा