मागच्या वेळी हुकले होते मंत्रीपद
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी आ. मकरंद पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांना साथ दिली. गत सरकारमध्ये त्यांना मंत्री करता आले नाही. मात्र, आता अजितदादांनी मकरंदआबांना मंत्री करा, अशी मागणी वाई विधानसभा मतदार संघातून होत आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात स्व. लक्ष्मणराव पाटील व कुटुंबियांची नाव अग्रभागी राहते. जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व लक्ष्मणराव पाटील यांनी केले. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा कायमस्वरुपी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिल, यासाठी प्रयत्न केले. त्यांचा वारसा आ. मकरंद पाटील व त्यांचे बंधू खा. नितीन पाटील यांनी पेलला आहे.
वाई-खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघात मकरंद पाटील यांनी विजयाचा चौकार मारला आहे. याशिवाय किसनवीर सहकारी साखर कारखाना, खंडाळा साखर कारखान्याची जबाबदारी पेलण्याचे काम हे बंधू करत आहेत. दोन्ही कारखाने अडचणीत असताना त्यांनी निवडणूक लढवून हे कारखाने ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांचे कारखाने वाचवण्यासाठी स्वत:ची आमदारकी देखील पणाला लावली.
या दरम्यान शरद पवार आणि अजित पवारांनी वेगवेगळी राजकीय मार्ग स्विकारले. अजित पवारांनी भाजप, शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी अजित पवारांसोबत जायचे की नाही, यावर ते अडकले होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच दोन्ही साखर कारखाने वाचवण्यासाठी त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
आ.मकरंद पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा दमदार यश मिळविले आहे. सातारा जिल्ह्याची जबाबदारी सांभळण्यासाठी ते सक्षम असून, त्यांना अजित पवारांनी कॅबिनेट मंत्रिपद आबांना देवून ताकद देण्याची गरज आहे.
मागच्यावेळी मंत्रिपद राहिले
अजित पवार हे मकरंद पाटलांना कॅबिनेट मंत्री करणार होते. मात्र, तिन्ही पक्षातील काही अडचणींमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडत गेला. शेवटपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. आता मात्र मकरंद आबा यांना कॅबिनेट मंत्री करण्याची वेळ आली आहे. अजित पवार यांनी आ. मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्री करुन सर्व सामान्य जनतेत मिसळणाऱ्या मकरंद आबांना संधी द्यावी अशी मागणी वाई- खंडाळा- महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातून होत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा