आमदार अशोक पवार यांची पंधरा वर्षाची सत्ता उलथवली
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर हवेली मतदार संघात अशोक पवार यांनी प्रचारात घेतलेली आघाडी होती परंतु माऊली कटके यांनी सूत्रबद्धपणे प्रचार आणि महायुती सरकारच्या योजनांच्या बळावर न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक विजय मिळवत शिरूर हवेली मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व गाजवले, सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक, मध्यंतरी काटे की टक्कर आशा स्वरूपात आली, परंतु मतमोजणीच्या वेळी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला टेम्पो टिकवण्यात माऊली आबा कटके यशस्वी झाले, मतदारांमध्ये सुद्धा कोण विजय मिळवेल अशी शंका निर्माण झाली परंतु, माऊली कटके यांचा आत्मविश्वास व सर्वसामान्य माणसात मिसळून आपलंसं करण्याचा अंदाज लोकांना भुरळ घालून गेला, काही दिवसातच माऊली आबा हे, आबाल वृद्ध व तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले.
या लढतीमध्ये अशोक पवार यांना एकूण १,१७,७३१ मते पडली तर माऊली कटके यांना १,९२,२८१मते पडली. शिरूर हवेली मतदारसंघातील सर्व रेकॉर्ड मोडत भल्या भल्यांची भाकीते खोटे ठरवून माऊली आबा कटके हे ७४,५५० मतांनी दणदणीत विजयी झाले. आणि विशेष म्हणजे सुरुवातीपासून मिळालेली आघाडी माऊली कटके यांनी शेवटच्या फेरीपर्यंत टिकुन राहिली. उज्जैन दर्शन, लाडकी बहिणी योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, अशा अनेक महायुती सरकारच्या योजना त्यांच्या पथ्यावर पडलेल्या दिसून आल्या.
माऊली कटके विजयानंतर प्रभू रामलिंग महाराजांच्या दर्शनाला गेले तेथून मार्केट यार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. नंतर अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचरने यांच्या शक्ती स्थळा वर जाऊन नतमस्तक झाले.
यावेळी त्यांच्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, बाबासाहेब फराटे, सुधीर फराटे ,माजी उपसभापती पंचायत समिती राजेंद्र जासूद ,शिरूर तालुका अध्यक्ष रवी काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, शिरूर शहराध्यक्ष शरद कालेवार, अनुसूचित जाती जमातीचे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव, शिवसेना शहराध्यक्ष मयूर थोरात माजी उपनगराध्यक्ष जाकिर पठाण, रंजन झांबरे ,निलेश जाधव, एजाज बागवान यावेळी असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा