पक्षाने संधी दिल्यास गद्दारांना मातीत लोळवणारच"....
शिवशाही वृतसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
सिंदखेडराजा विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार तयारीला लागले आहेत. मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. मात्र "ड्रामा वैगरे काही असूद्या..कोणी किती बी उड्या मारुद्या...या मतदारसंघावर शिवसेनेचा (उबाठा) भगवा फडकणार म्हणजे फडकणारच" असा खंबीर आशावाद व्यक्त केलाय तो निष्टांवंत शिवसैनिक, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव वाघ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत.
त्यासाठीच्या आवश्यक गाठीभेटी घेऊन पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी देखील त्यांनी केली आहे..पक्षाने संधी दिल्यावर शिवसेनेशी, महाविकास आघाडीशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांना मातीत लोळवणारच असेही ते बोलतांना म्हणाले..
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिलीप वाघ यांचा आजवरचा प्रवासच संघर्षाचा आहे. गेल्या २५ वर्षांपासून ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. सुलतानपूर येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली होती. शिवाय जिल्हा नियोजन समिती सदस्य, शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून देखील त्यांनी नावलौकिक मिळवला. रेणुका हायब्रीड सीड्स, कलिंका सिड्स, जय महाकाली फार्मर प्रोडूसर कंपनी, ओंकार सिड्स या माध्यमातून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील गावागावातील शेतकऱ्यांशी दिलीप वाघ यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
२५ वर्षाच्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीत शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी शेकडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी रस्ता मिळवून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक आंदोलनात वाघ यांचा पुढाकार होता. नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना तातडीने मोबदला मिळावा यासाठीही वाघ यांनी वेळोवेळी शिवसेना स्टाईल आक्रमक भूमिका घेत आंदोलने केली आहेत. त्यामुळे उबाठा शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत दिलीपराव वाघ आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
दिलीपराव वाघ म्हणतात, जनतेचा सेवक म्हणून काम करील...
मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या वेदना, सामान्य जनतेच्या वेदना काय असतात हे मी अनुभवलेआहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाने आमदार या नात्याने आतापर्यंत व्हीआयपी कल्चर अनुभवले. आमदार म्हणजे काय असतो, कसा दिसतो हेदेखील लोकांना माहीत नाही. सामान्य जनतेच्या मतांच्या भरवशावर सत्तेची फळे चाखणारे आमदार सामान्य जनतेला वर्ष वर्ष भेटत नाहीत. निवडणुका जवळ आल्या तेव्हाच यांना मतदारसंघाचा पुळका येतो.
हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची पायाभरणी ज्या भूमीतून झाली ती मातृतीर्थ सिंदखेड राजाची भूमी आहे, मात्र इथे विकास नावाला देखील दिसत नाही. साऱ्या जगाने नतमस्तक व्हावे अशी ही भूमी असतांना इथे विकास का झाला नाही? पर्यटकांसाठी सोयी का नाहीत? असा सवाल दिलीपराव वाघ यांनी केला. संपूर्ण सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विकासाचा प्रचंड अनुशेष आहे. खडकपूर्णा सारखा चांगला प्रकल्प आहे मात्र शेतकऱ्यांना पांधण रस्ते नाहीत. शेतमालाची ने - आण करणे सोयीचे नाही.गावोगावचे रस्ते, स्मशानभूमी सगळीच दुरावस्था आहे.
एवढी वर्षे सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वतःचा विकास केला, मतदारसंघाला मागास करून टाकले असा आरोपही दिलीपराव वाघ यांनी केला. मात्र आता सत्ताधाऱ्यांच्या पापाची तिजोरी भरली आहे. जनता आता त्यांना वैतागली आहे. शिवसेनेने , महाविकास आघाडीने एवढे देऊनही "त्यांनी" गद्दारी केली.
आता गद्दारांना मातीत गाडण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. या मतदारसंघात शिवसेनेची प्रचंड ताकद आहे, त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घ्यावा अशी आग्रही मागणी वरिष्ठांकडे केली असल्याचे दिलीपराव वाघ म्हणाले. पक्षाने संधी दिली तर गद्दारांना त्यांची जागा दाखवुन देऊ, पुढील ५ वर्षे जनतेचा सेवक म्हणून काम करू असेही दिलीप वाघ म्हणाले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा