बुलढाणा जिल्ह्यात वाघाचा वावर - शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत
शिवशाही वृतसेवा, सोयगाव तालुका प्रतिनिधी , रईस शेख
देव्हारी ते पिंपळवाडी ही सोयगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेली गावे आहेत. येथून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सध्या वाघाचा वावर वाढलाय. खाद्याच्या शोधात भटकंती करताना वाघाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा घाटात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला आहे. 29 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्या मध्ये 36 वर्षीय शेतकरी सुनील सुभाष जाधव हे मृत्यूमुखी पडले आहेत.
गोंधन खेड शिवारात गिरडा घाट जवळ त्यांचे शेत आहे. शेताचे राखण करत असताना दुपारच्या वेळेस वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्याचा गळा पकडून 30 ते 40 फूट दरीत घेऊन गेला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती घेऊन त्यांनी पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगी, पत्नी, 2 भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा