किसन वीरआबांनी भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक संस्थेची उभारणी केली
शिवशाही वाई तालुका प्रतिनिधी, शुभम कोदे
किसन वीरआबांनी भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक संस्थेची उभारणी केली, शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक गरजा भागविण्यासाठी जिल्हा बँकेची निर्मिती केली तसेच पंचक्रोशीमध्ये पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी धोम धरणाची निर्मिती केली तर तरूण वर्गाच्या हाताला रोजगार मिळावा त्याकरिता कारखान्याची उभारणी करून खऱ्या अर्थाने समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले. मात्र, मागील १८ वर्षामध्ये आबांनी लावलेल्या रोपट्याला कुजविण्याचे काम मागील संचालक मंडळाने केले होते. मात्र, आबांनी उभारलेल्या संस्थेला पुर्नजिवित करण्याचे काम माझ्यासह संचालक मंडळाला करता आल्याचा सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी काढले.
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, वाई तालुका सहकारी सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, राजेंद्र तांबे, नितीन भुरगुडे-पाटील, दत्तानाना ढमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मकरंदआबा पाटील पुढे म्हणाले की, ब्रिटीशांच्या जोखंडात असलेला आपल्या देशाला बऱ्याच नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र प्राप्त करून दिले. आपल्या जिल्ह्यामध्ये आबांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र लढ्याला सुरूवात झालेली होती, तो त्यांनी अखंडपणे सुरू ठेवला होता या सर्वांच्या त्यागातुनच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले होते. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. किसन वीर यांच्यामुळेच आपल्या जिल्ह्याला विकासाची चालना मिळत गेली. आबांनी काळाची पावले ओळखित सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली होती. किसन वीरआबांनी कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेचा उपयोग केलेली नव्हता आणि यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन झालेले दिसून येते. आबांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवतच लालसिंगराव मयंज्शिंञदे एज, आमदार डी. बी. कदम, नामदेवराव कदम, लक्ष्मणरावतात्या पाटील यांनी काम केलेले होते.
परंतु शेतकऱ्यांना मागील १८ वर्षांपुर्वी वाटले की, यांच्यापेक्षा जास्त मोठे काम होईल म्हणून त्यांनी कारखान्यामध्ये सत्तांतर घडविले. परंतु शेतकऱ्यांनाही लवकरच त्यांचे खरे रूप समजले आणि त्यांचा हिरमोड झाला. शेतकऱ्यांना ज्यावेळी मागील संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभार समजला त्यावेळी खुप उशिर झालेला होता, कारखान्याचा लिलाव होण्याची वेळ आलेली होती तसेच कामगार व शेतकरी उपाशी मरण्याची वेळ आलेली होती. परंतु शेतकरी व कामगारांच्या हितासाठी व आग्रहास्तव कारखान्याची सुत्रे हातात घेतली. त्यावेळी प्रत्यक्षात पाहिले असता अक्षरशः अंधःकार पुढे होता. या महाभागांनी काय काय दिवे लावले होते ते पाहून थक्क होत होते. कामगार देणी, बँक देणी, शेतकरी देणी, वाहन मालक देणी, विविध संस्थांची देणी थकवलेली होती. प्रकल्प उभे केले परंतु त्यातुन येणारे उत्पन्न कोठे जात होते हेच समजत नव्हते. आम्ही आमची राजकीय कारकिर्द कारखान्यासाठी पणाला लावलेली होती.
आमचा प्रामाणिक प्रयत्न होता की काहीही करून शेतकऱ्यांनी जी जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे ती काहीही करून पार पाडायची. परंतु यामध्ये खुप अडचणींना सामोरे जावे लागले. महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरे तसेच मध्यंतरीच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडी यामुळे पुढे काय होईल काय समजत नव्हते. राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादांनी पहिल्या १० मंत्र्याच्या यादीमध्ये कॅबिनेट पद दिलेले होते परंतु ते नाकारून शेतकऱ्यांनी जी जबाबदारी टाकलेली आहे, ती महत्वाची आहे. आम्हाला कारखान्याला मदत करा, ती मला मंत्रीपदापेक्षाही मोठी आहे असे ठामपणे सांगितलेले होते. नामदार अजितदादांनीदेखील आपल्या मागणीला तत्वतः मान्यता दिली. मागील आठवड्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती की, कारखान्याला मिळालेली थकहमी रखडली. या बातमीमुळे काही अपप्रवृत्तींना आनंद झालेला होता. परंतु मी आज जाहीरपणे सांगतो की, महायुतीमुळे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, ना. अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळेच दोन दिवसांपुर्वीच किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या खात्यावर एकुण ४६७ कोटी रूपये जमा झालेले आहेत.
ही मिळालेली थकहमी ९.८१ टक्के व्याजदराने असून त्याची परतफेड आठ वर्षामध्ये कारखान्याला करावा लागणार आहे. मिळालेल्या कर्जामधुन आपण २०२०-२१ मधील जी एफआरपीची थकीत रक्कम जवळपास ४५ कोटी आहे ती व २०२३-२४ मधील उर्वरित बीले १६ कोटी रूपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत. बँकांची ओटीएस रक्कम कामगारांचा प्रॉव्हीडंट फंड, शासकीय देणी देणार आहोत. यामुळे आता आपला कारखाना हळुहळु पुर्वपदावर येण्यास सुरूवात होणार आहे. याकरिता आता शेतकऱ्यांनीही आपला संपुर्ण पिकविलेला ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला गळीताकरिता देणे गरजेचे आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्याने गाळपाचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे ते पुर्ण करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर असून जेवढे जास्त गाळप होईल तेवढे कारखान्यावरील कर्ज लवकरात लवकर फेडण्यास मदत होणारआहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी आपला संपुर्ण ऊस दोन्ही कारखान्याच घालण्याचे आवाहन आमदार मकरंदआबा पाटील यांनी केले आहे.
व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची मातृसंस्था टिकली पाहिजे, सहकार अस्तित्वात राहिला पाहिजे, याकरिता व जो ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत होता, त्याकरिताच कारखान्याची निवडणुक लढविली व जिंकली. कोणतेही अर्थसहाय्य न घेता मागील दोन हंगाम यशस्वी केलेले असून या हंगामाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांचा एक रूपायाही बुडणार नाही याची हमी मी कारखान्याच्यावतीने देत असल्याचे सांगुन वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याला एक भक्कम असा आमदार लाभलेला आहे असून त्यांच्यामुळेच दोन्ही कारखान्याला थकहमीची रक्कम मंजुर झाली. वाई व खंडाळा तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर झाल्यामुळे दुष्काळनिधीची ४० कोटींची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. त्यामुळे वाई- खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यातील जनतेनेही आमदार मकरंदआबा पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. संचालक संदिप चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये किसन वीरआबांचा जीवनपट उलघडुन सांगुन उपस्थितांना दिनांक व सालासह माहिती देऊन अबंचित केले. तसेच किसन वीरआबांना अभिप्रेत असलेले काम कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्याकडून होत असल्याचे सांगितले. यावेळी नितीन भरगुडे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले तर आभार संचालक दिलीप पिसाळ यांनी मानले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, मोहनराव जाधव, रमेश गायकवाड, पोपट जगताप, भैय्या डोंगरे, भुषण गायकवाड, महादेव मसकर, मदन भोसले, सत्यजित वीर, दत्तात्रय शेलार, कुमार बाबर, मनिषा गाढवे, शिवाजीराव काळे, अरूण माने, शशिकांत पवार, अरविंद कदम, बबनराव साबळे, मंगेशराव धुमाळ, अॅड. उदयसिंह पिसाळ, तानाजीराव शिर्के, सुरेशराव बाबर, प्रा. सुनिल शेळके, संपतराव शिंदे, मधुकर भोसले, रविंद्र क्षीरसागर, सागर शेळके, मानसिंगराव साबळे, मनिष भंडारी, सुधीर भोसले, राजेंद्र सोनावणे, शुभम (आण्णा)पवार, कांतीलाल पवार, शामराव गायकवाड, नितीन निकम, अब्दुल इनामदार, अमृत गोळे, सर्जेराव पवार, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
आम्ही आमची जबाबदारी पार पाडली आता वेळ तुमची आहे आमदार मकरंदआबा पाटील
एक हजार कोटींचे कर्जाचा डोंगर असतानादेखील शेतकऱ्यां व कामगारांच्या हितासाठी आमची राजकीय कारकिर्द पणाला लावुन कारखाना मागील दोन वर्षापुर्वी ताब्यात घेतला. त्यावेळी शब्द दिलेला होता की शासनाकडुन मदत मिळवुन देईन. तो शब्द मी व माझ्या संचालक मंडळाने पुर्ण केलेला आहे. त्यामुळे आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे. आता वेळ आली आहे ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांनीही आपला संपुर्ण पिकविलेला ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला गळीताकरिता घालुन सहकार्य करावे. किसनवीर ७ लाख व खंडाळा कारखाना ३ लाख असे मिळुन १० लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ठ संचालक मंडळाने ठेवलेले आहे ते पुर्ण करण्याचे आवाहनही आमदार पाटील यांनी केले
.---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा