सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू असून, त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दिनांक 2 जून 2024 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्शदर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रापुर्व नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक सोयी सुविधा
यावेळी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन तसेच मूर्ती संरक्षणास प्राधान्य देऊन कामास सुरुवात करण्यात आली.
सदरचे काम करत असताना काही नव्याने कामे निदर्शनास आल्याने या कामांसाठी 45 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागला आहे. सदरचे काम पूर्णत्वास येत असून, संवर्धनाचे काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने करण्यात आले आहे. याशिवाय, 2 जून पासून भाविकांच्या शुभहस्ते पूजा देखील सुरू करण्यात येणार आहेत. तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
आषाढी यात्रेसाठी 2000 कर्मचारी व स्वयंसेवकांची नियुक्ती
आषाढी यात्रा दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न होत असून, आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मोठया प्रमाणात भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना सुलभ व तात्काळ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.
तसेच दर्शन रांग, पत्रा शेड, दर्शन मंडप या ठिकाणी भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी दोन हजार कर्मचारी व स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दिनांक 07 ते 26 जुलै दरम्यान 24 तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
यावेळी दर्शनरांग व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, यात्रेतील प्रथा व परंपरा, सुरक्षा व्यवस्था, दर्शनरांगेतील अन्नदान, वैद्यकीय व्यवस्थेचे स्टॉल, स्वच्छता व्यवस्था, शासकीय महापूजा, लाईव्ह दर्शन व्यवस्था, देणगी व्यवस्था, निवास व्यवस्था, अपघात विमा पॉलिसी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही व वायरलेस यंत्रणा, लाडू प्रसाद व्यवस्था, महिलांसाठी चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष व विश्रांती कक्ष इत्यादी व्यवस्थेचा आढावा घेवून आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनास केल्याची माहिती दिली.
तत्पुर्वी श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील सुरु असलेल्या कामांची पाहणी मंदिर समितीचे सर्व सदस्य यांनी पुरातत्त्व विभाग, वास्तुविशारद व ठेकेदार यांच्या समवेत केली व संबधितांना आवश्यक सुचना यावेळी दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा