वीजवितरण विभागाची धडक कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
सेनगाव - तालुक्यातील चोंढी बुद्रूक व चोंढी खुर्द येथे विज वाहिनीवर आकडे टाकून अनाधिकृत विज वापरणाऱ्या ३२ जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात बुधवारी ता. ८ सकाळी विज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या विज कंपनीकडून विज देयकाची थकबाकी वसुली मोहिम सुरु आहे. या मोहिमेसोबतच ग्रामीण भागातील विज वाहिनीवर आकडे टाकून विज वापरणाऱ्यांची तपासणी देखील केली जात आहे. त्यानुसार विज कंपनीचे सेनगाव उपविभागाचे अभियंता सत्यनारायण वडगावकर यांच्या पथकाने चोंढी बुद्रूक व चोंढी खुर्द येथे अचानक तपासणी मोहिम हाती घेतली. या तपासणीमध्ये धक्कादायक बाब पुढे आली आहे. गावातील एक दोन नव्हे तर तब्बल ३२ जणांनी विज वाहिनीवर आकोडे टाकून अनाधिकृतपणे विजेचा वापर चालविल्याचे दिसून आले.
या प्रकरणात अभियंता वडगावकर यांच्या पथकाने विज वाहिनीवरील आकोडे टाकण्यासाठी वापरलेले केबल जप्त केले आहे. तसेच या गावकऱ्यांना दंडासह विजेचे देयक भरण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही या गावकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिलाच नाही. त्यामुळे अभियंता वडगावकर यांनी आज सकाळी सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यावरून पोलिसांनी आत्माराम काळे, साहेबराव भालेराव, सुभाष काळे, दिलीप खिल्लारे, लक्ष्मण काळे, कैलास बनसोडे, विजय काळे, संतोष वायचाळ, विठ्ठल शिंदे, रामेश्वर कवर, रामेश्वर काळे, अमोल बनसोडे, मधुकर बनसोडे, ईश्वर बनसोडे, सोनु गोडे, अविनाश साळवे, जनार्धन काळे, गजानन जाधव, संजय काळे, लक्ष्मण इंगोले, दामोदर झाडे, यशवंत मोरे, गंगाराम शिंदे, नामदेव काळे, लक्ष्मण निवृत्ती काळे, लक्ष्मण अंभोरे, नारायण तांबोळी (सर्व रा. चोंढी खुर्द), गौतम भालेराव, बंडू खिल्लारे, त्र्यंबक काळे (रा. चोंढी बुद्रूक) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा