घरोघरी टायफाईडचे रुग्ण, इतरही आजार बळावले
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सुरूर ता. वाई येथील यात्रा ग्रामस्थांच्या मुळावरच उठल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थिती व दुसरीकडे यात्रेसाठी पाण्याची अधिक गरज भासणार यामुळे ग्रामपंचायतीने दुस-या विहिरीचे पाणी यात्रा कालावधीत ग्रामपंचायत पाणीपुरवठ्यासाठी वापरले आणि तेथूनच हे दुर्दैवी चक्र सुरु झाले. यात्रेच्या दरम्यान ग्रामस्थांना ताप, उलट्या हे प्रकार सुरु झाल्याने घरोघरी ग्रामस्थ बाधित झाले. ग्रामस्थांच्यामधून सुमारे २०० लोकांना हा त्रास झाल्याचे सांगण्यात येत आहे. तालुका आरोग्य विभागाने तातडीने या गोष्टीची दखल घेऊन उपाययोजना करून साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असला तरी अजूनसुद्धा ग्रामपंचायत पाणीपुरवठ्यामध्ये दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अजूनसुद्धा सदर आजाराचे अल्प प्रमाणात रुग्ण सद्यस्थितीत बळी पडत असून ग्रामस्थांना ऐन यात्रेत यात्रा सोडून दवाखान्यात भरती व्हावे लागल्याने मोठ्या प्रमाणात सुरु असलेले हे सत्र अल्पप्रमाणात अजूनसुद्धा सुरु आहे. काही घरातील सर्व कुटुंबाला हा त्रास झाल्याने सर्व कुटुंबीय दवाखान्यात दाखल करण्यात आल्याने वैयक्तिक या कुटुंबाना यात्रा रद्द करावी लागली होती. वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागल्याने आर्थिक भुर्दंड ग्रामस्थांना सहन करावा लागला आहे. यामध्ये येणारा ताप हा जास्त प्रमाणात झाल्याने एका रुग्णाची मानसिक स्थिती तात्पुरत्या स्वरूपात बिघडल्याचेसुद्धा ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
तातडीने उपाय योजना केली असली तरी अजूनसुद्धा रुग्ण सापडत असल्याने समूळ दोष दूर झाला नसून या घटनेच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांच्यातून बोलले जात आहे. तसेच यात्रा कालावधीमध्ये या गावातून जे पाहुणे जेवण करून गेले त्यांचे काय झाले ? याबाबत माहिती नसली तरी निश्चितच त्यांनाही त्रास झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उलट परिसरातील विहिरी दुष्काळी परिस्थितीने पाण्याअभावी कोरड्या पडल्या असून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायतीला कसरत करावी लागत असल्याने एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष व दुसरीकडे टायफाईडची भीती अश्या दुहेरी संकटात सुरूर गाव सापडले असले तरी पाणी पुरवठा करताना योग्य उपाययोजना करण्याची गरज अजूनसुद्धा भासत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा