लाभार्थी खूष - वाळू माफियाचे मात्र धाबे दणाणले
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
दुसरबीड येथे दि. ९ व १० मे रोजी सिंदखेडराजाचे तहसीलदार प्रविण धानोरकर यांना ३० ते ३५ ब्रास रेती साठा दिसून आला यानंतर तो रेतीसाठा जप्त करण्यात आला. यावेळी जप्त करण्यात आलेला रेतीसाठा सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी स्थानिकच्या घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे सांगितले. त्यानुसार दुसरबीड ग्रामपंचायतने दिलेल्या १९ लाभार्थ्यांच्या यादीपैकी १० लाभार्थ्यांना वाहतूक खर्च करून इतर कोणतेही शुल्क न आकारता मोफत रेतीचे वाटप करण्यात आले.
यामध्ये घरकुल लाभार्थी गबाजी त्र्यंबकराव पवार, गजानन बाबुराव जगताप, संजय साहेबराव मोतेकर, शंकर अजबराव ढवळे, बाबुराव नामदेव जगदाळे, विठ्ठल आसाराम इंगळे, उत्तम रोडूबा शिंदे, बाबासाहेब भगवान भोसले, लीलाबाई तुकाराम जाधव, निर्मलाबाई किसन तिपाले या दहा व्यक्तींना प्रत्येकी २ ब्रास रेतीसाठा वाटप करण्यात आला. त्यामुळे लाभार्थ्यांना शासनाकडून मोफत रेती मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.
तहसीलदार प्रविण धानोरकर यांनी दिलेल्या माहितीवरून जप्त केलेल्या ३० ब्रास रेती मधुन ग्रामपंचायत ने दिलेल्या यादीतील १९ पैकी १० लाभार्थ्यांना प्रत्येकी २ ब्रासप्रमाणे तात्काळ मोफत रेतीचे वाटप करण्यात आले. परंतू उर्वरित ९ घरकुल लाभार्थी मात्र रेती केव्हा मिळेल या प्रतीक्षेत आहेत.
महसूल विभागाच्या या कारवाईनंतर घरकुल लाभार्थ्यांना याचा निशुल्क लाभ झाला असला तरी अवैध रेती तस्करी करणाऱ्यांवर मात्र कारवाईबाबत महसूल प्रशासनाने कोणतीही पाऊल न उचलता सोयीस्कर टाळाटाळ केल्याने याची दखल रेती तस्करांचे कर्दनकाळ म्हणून प्रसिद्ध असलेले उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे घेतील का? अशी चर्चा जनमाणसात होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा