रामलीला मैदानाचा कारभार रामभरोसे
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - येथील ऐतिहासिक रामलीला मैदानाचे चार ही गेटची अवस्था ना घर का ना घाट की झाल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून मैदानाची बकाल अवस्था झाली आहे. मोडकळीस पडलेले गेट दुरूस्ती साठी अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे.
येथील ऐतिहासिक रामलीला मैदानाच्या सपाटीकरणासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या पुढाकारातून मागील चार वर्षांपूर्वी तीन कोटी रुपयांचा निधी खर्च करीत मैदानाची डागडुजी केली. कोट्यवधी रुपयांचा निधी उधळून ही संरक्षण भिंतीच्या चारही गेटची बकाल अवस्था झाली असून मोडकळीस येऊन पडले आहेत. याचा फायदा घेत मद्यपान करणाऱ्यांनी चक्क रामलीला मैदानावर दारूचा अड्डा केला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक परंपरा असलेल्या मैदानाची पुन्हा दुरवस्था झाली आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष घालतील का असा सवाल सामान्य नागरिकांतून होत आहे.
१५० पेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेल्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर म्हैसूर नंतर भारतातून दुसरा दसरा मोहत्सव भरवला जातो. महसूल प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून याठिकाणी विविध प्रदर्शनी, तसेच मनोरंजनासाठी लहान मुलांसाठी आकाश पाळणे, असे अनेक खेळणी भरविली जाते. याशिवाय कृषी प्रदर्शनी, हॉटेल, आदी दुकाने थाटली जातात. तसेच कुस्ती स्पर्धा, रामलीला आदी उपक्रम राबविले जातात.
यातून आलेल्या निधीतून महसूल विभाग विविध पारितोषिक तसेच रावण दहन कार्यक्रम घेतले जातात. कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून देखील मागील चार दिवसांपासून तुटून पडलेल्या गेटची दुसरुस्ती करण्यासाठी पैसे नसतील किंवा वेळ मिळत नाही कारणे सांगून वेळ मारीत आहेत.
ऐतिहासिक रामलीला मैदानाच्या सपाटीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. पालिकेने सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांची झाडे लावली मात्र ही झाडे वाळली असल्याने लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. काही झाडे जिवंत असून ही झाडे वाळण्याच्या प्रतीक्षेत असताना देखील पालिकेचे साफ दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाचा चुराडा झाला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा