स्थानिक बसेस बंद असल्याने प्रवाशांचे हाल
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
राजमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सिंदखेडराजा येथील बसस्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नसून, प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच, बसस्थानकांवर अनेक सुविधांची वाणवा असून, प्रवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. तसेच, या बसस्थानकावरून स्थानिक बसेस बंद केल्या गेल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
सविस्तर असे, की सिंदखेडराजा हे विदर्भाचे प्रवेशद्वार असलेले प्रमुख शहर आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना मार्गाने नागपूरकडे जाणार्या बसेस येथील बसस्थानकावर येत असतात. देऊळगावराजा मार्गाने नागपूर दूर पडत असल्याने ह्या मार्गाने बसेसची संख्या जास्त आहे. तसेच येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. आजुबाजुला असलेल्या पळसखेड, सावखेड तेजन, हनवतखेड, माहेरखेड, वाघोरा, आडगाव राजा, पिंपरखेड, चिंचोली, शेलू, भोसा, डावरगाव, धांदरवाडी, अंचली, नसीराबाद, माळ सावरगाव , बामखेड, असोला, बोरखेडी बावरा, पळसखेड झाल्टा, तुळजापूर आदि खेड्यापाड्यांतील ग्रामस्थांसाठी ही प्रमुख बाजारपेठ आहे. खाजगी वाहनांची संख्या वाढत असली तरी एसटी बसला प्राधान्य असते. तर खाजगी वाहनांचा राबता बसस्थानकाजवळच असतो. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या प्रवाश्यांना वाहनांची वाट बघण्यासाठी बसस्थानकावरच थांबावे लागते.
सुरुवातीला केल्या गेलेली पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेतील सामुग्री नादुरुस्त व तूटफुट झाल्यावर, दुरुस्ती न केली जाता अजूनही त्याच अवस्थेत आहे. त्यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी आजूबाजूच्या हॉटेल्स मध्ये जावे लागते. नाहीतर पाण्याची बॉटल विकत घ्यावी लागते. त्यामुळे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकार्यांनी वेळीच दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा