वाळू माफिया कडून 35000 लाच घेतल्याने तहसीलदार, वाहन चालक, व शिपाई गजाआड
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा : वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर मासिक ३५ हजार रुपये हप्त्याने खुलेआम चालू द्यावा, यासाठी ३५ हजारांची लाच स्वीकारणारा सिंदखेड राजाचा तहसीलदार सचिन जयस्वालसह चालक आणि शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ एप्रिलला दुपारी दोन वाजता केबिनमध्येच पकडले. ऐन निवडणुकीच्या धामधूमित 'एसीबी'ने केलेल्या या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे. सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात नदीपात्रातून वाळूचे बेसुमार उत्खनन आणि वाहतूक केली जाते. सिंदखेड राजात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ट्रॅप लावला. तहसीलदार सचिन जयस्वाल (४३) सह चालक मंगेश शालीग्राम कुलथे (४०) व शिपाई पंजाबराव
तेजराव ताठे (५५) अशी अटक केलेल्या लाचखोर लोकसेवकांची नावे आहेत. काही महिन्यांपूर्वी सिंदखेड राजा येथे तहसीलदारपदी रुजू झालेल्या तहसीलदार जयस्वाल यांनी आपले नियमबाह्य कारनामे दाखवायला सुरुवात केली. सध्या वाळू घाटांचा लिलाव न झाल्याने एका व्यक्तीने रेतीची बेकायदा वाहतूक करण्याचा इरादा केला, त्यासाठी तहसीलदाराचा हस्तक असलेला शासकीय चालक मंगेश कुलथे याने 'साहेबां' साठी दरमाह ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याची पूर्तता झाल्यानंतरच ट्रॅक्टर चालू दिला जाईल, अशी तंबी दिली. दरम्यान, तक्रारकत्यनि बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली. 'एसीबी'च्या पथकाने १२ एप्रिलला पडताळणी कार्यवाही करून लाचेची खात्री केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा