ऑल इंडिया पँथर सेनेचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा प्रतिक सोनपसारे
खामगांव शहरातील शिवाजी नगर आणि शहर पोलीस स्टेशनतंर्गत गत काही दिवसांपासून अवैध धंदे मोठ्याप्रमाणात वाढीस लागले आहेत. या धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे ऑल इंडिया पॅथर सेनेच्यावतीने सोमवारपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली.
निवेदनानुसार, खामगाव शहरात गत काही दिवसांपासून अवैध धंदे वाढीस लागल्याबाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र, पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने, साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिल्याचे निवेदनात नमूद केल आहे. शहरातील आठवडी बाजार, कॉटन मार्केट, बसस्थानक चौक, मस्तान चौक, फरशी, एमआयडीसी, घाटपुरी परिसरात दारू, सट्टा, जुगार यासारखे अवैध धंदे वाढीस लागले आहेत.
शहरातील काही ठिकाणी बनावट दारू कारखाने सुरू असून, विना परवाना चोरट्या मार्गाने गुटखाही शहरात दाखल होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. या साखळी उपोषणात जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे, जिल्हा संघटक विनोद कळसकार, जिल्हा महासचिव अतुल इंगळे, शहर सचिव अमर जाधव, बंटी गव्हांदे आदींचा समावेश आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा