टिप्पर व ट्रॅक्टर जप्त चार लाखांचा होणार दंड
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरीफ शेख
सिंदखेड राजा येथे रुजू झाल्याच्या काही दिवसांतच उपविभागीय (महसूल) अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी वाळूमाफियांना आपले कर्तव्यकठोर रुप दाखवून दिले. १८ मार्चच्या रात्री नदीपात्रातून पायी जात रेतीची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. एक टिप्पर व ट्रॅक्टर जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आली असून, वाळूतस्करांना ३ लाख ८५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
प्रा. संजय खडसे यांनी निडरपणे केलेल्या कारवाईचे कौतुक होत असून, दुसरीकडे रेतीमाफियांनी या कारवाईची घास्ती घेतली आहे. नुकतीच देऊळगाव राजाच्या नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यानेतृत्वाखाली अवैध रेतीची वाहतूक करणारी पाच वाहने पकडली. तरीदेखील रेतीमाफियांनी आपला रेतीचा अवैध व्यवसाय चोरीछुपे सुरू ठेवला होता. याची माहिती मिळताच एसडीओ प्रा. संजय खडसे यांनी निवडणुकीच्या काळातदेखील प्रचंड व्यस्त असताना रात्री रेतीमाफियांविरोधात कारवाई केली. सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्यासह तलाठी आणि दोन पोलिसांना सोबत घेऊन संजय खडसे यांनी ज्या, ज्या ठिकाणी रेती वाहतूक केली जाते, तेथे नदीपात्रातून पायी जावूनधाडी घातल्या.
रात्री बारा वाजेदरम्यान गस्तीवर असताना त्यांना साठेगाव आणि नारायणखेड येथे एमएच-२८-एबी-८४३२ क्रमांकाचे ज्ञानेश्वर बबनराव यांचे टिप्पर आणि एक विनानंबरचे बळीराम प्रकाश मुंडे यांचे ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करताना रंगेहात पकडले. दंडात्मक कारवाईसाठी ही वाहने अंडेरा पोलीस ठाण्यामध्ये अटकाव करून ठेवण्यात आली आहेत. तहसीलदार सचिन जयस्वाल, तलाठी यशवंत घरजाळे, तलाठी थोरात, पंजाबराव ताठे, चालक चव्हाण, मंगेश कुलथे आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा