आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुढे आले दातृत्वाचे अनेक हात
शिवशाही वृत्तसेवा, वाई जिल्हा प्रतिनिधी, शुभम कोदे.
वाई, दि. 12 – वनव्यामुळे लागलेल्या आगीमध्ये रविवार, दि. 10 मार्च, 2024 रोजी दुपारी जळून खाक झालेली दोन जनावरे व जखमी झालेले दशरथ कोचळे, रा. पिराचीवाडी, (ता. वाई) यांच्या मदतीसाठी सोशल मिडीयावरील नेटकरी सर्वप्रथम धावले आहेत. गेल्या दोन दिवसांत हजारो रूपयांचा निधी नेटकरी मित्रांनी जमा करून थेट कोचळे कुटुंबाच्या बँक खात्यावर जमा केला आहे.
वाई तालुक्यात गेले अनेक दिवस डोंगरांना वनवे लागण्याचे सत्र काही केल्या थांबेना झालेले आहे. त्यातच पिराचीवाडी येथे रविवारी कोचळेवाडीकडून आलेल्या वणव्यामध्ये डोंगराच्या कुशीत असलेल्या दशरथ कोचळे यांच्या मांडवाला लाग लागली. आजूबाजूला भवस, मोठे गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामध्ये कोचळे यांचा मांडव अलगद कवेत घेतला आणि गाय व खोड आगीमध्ये सापडले. त्यांना सोडून बाहेर काढणेपर्यंत मांडव जळाल्याने मुकी जनावरे आगीत अक्षरशः होरपळली. एक जनावर पन्नास टक्के भाजले, त्यांना वाचविण्यासाठी धावून गेलेले दशरथ कोचळे हे देखील 35 ते 40 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर वाईतील घोटवडेकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना भेटून रोख रक्कम देण्याऐवजी अनेक नागरिकांनी त्यांच्या मुलाच्या बँक खात्यावर ही लाखाची मदत देऊन त्यांना जळीतापासून उभारी देण्याचे काम केले आहे व समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.
कोचळे यांच्या गुरांचे व मांडवाचे फोटो सोशल मिडीयावर पसरल्यमुळे नेटकरी सुरूवातीला संतप्त झाले. परंतु गावातील प्रमुख कार्यकर्ते व मित्रमंडळी यांनी कोचळे कुटुंबावर कोसळेल्या या संकटावर मात करण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमांतून मदत करण्याचे आवाहन केले.
कोचळे कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची विनंती केली. त्यासाठी कोचळे यांच्या मुलाच्या बँक खात्याचा क्यू आर कोड सर्वांना पाठवला. वाईतील प्रमुख व्हाँटस अँप ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा क्यू आर कोड पाठविण्यात आला. त्यांच्या आवाहनानुसार वाई परिसरांतील मान्यवर, व्यापारी, पिराचीवाडी व गुंडेवाडी येथील अनेक ग्रामस्थ युवक यांनी 100 रूपयांपासून 5 हजार रूपयांपर्यंत आपल्याला जमेल तशी मदत केली. सोमवारी व मंगळवारी त्यांच्यावर मदतीचा ओघ सुरू राहिला. महसूल विभागाकडून जळीताचा पंचनामा केलेला आहे. मात्र त्यांनी किती मदत केली, हे अजून समजलेले नाही. मात्र नेटकरी नागरीकांनी एका शेतक-याला केलेली ही तात्काळ मदत ही शेतक-यांना उभारी देणारी अशी आहे. हे नक्की. मराठवाडा, विदर्भ या भागात शेतकरी आत्महत्येसारखा पर्याय निवडतात, पण पिराचीवाडी गावातील युवकांच्या प्रयत्नांमुळे एका शेतकरी कुटुंबाला उभे करण्याचे पुण्यकर्म घडले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा