हिरवा झेंडा दाखवण्यासाठी उपस्थित रहावे- खासदार हेमंत पाटील
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली :- मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वेची मागणी, हिंगोलीकरांनी मागील 10 वर्षापासून केली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्यासह रेल्वे संघर्ष समिती व अनेकांनी पाठपुरावा केला आहे. त्या अनुषंगाने मुंबईला जाण्यासाठी नव्याने सुरू झालेल्या, हिंगोली - मुंबई (गाडी क्रमांक 12071/12072) रेल्वे एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 9 मार्च दुपारी 3 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत हिंगोली येथून मुंबईसाठी नव्याने जनशताब्दी एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीत 9 मार्च रोजी हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, आमदार विप्लव बाजोरिया, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे यांच्यासह माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार गजाननराव घुगे, माजी आमदार रामरावजी वडकुते, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हिंगोली येथून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी, मागील दहा वर्षापासून रेल्वे संघर्ष समिती व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करत वेळप्रसंगी आंदोलन ही करण्यात आली. या लढ्याला खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून यश येत, आता ही गाडी सुरू झाली आहे. या गाडीला एकूण 22 बोगी असून त्यामध्ये 19 बोगी जनरल तर एक वातानुकूलित आहे. या रेल्वेमुळे हिंगोली- वसमत- पूर्णा -परभणी या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना अतिशय सोयीचे झाले आहे. तसेच संभाजीनगर, नाशिक या ऐतिहासिक शहरापर्यंत अगदी कमी तिकीट दरामध्ये सर्वसामान्यांना पोहोचण्यासाठी सोयीचे झाले आहे. यामुळे सर्वसामान्यातून नव्याने सुरू झालेल्या रेल्वेचे स्वागतच होत आहे.
नव्याने सुरू झालेल्या हिंगोली- मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसच्या स्वागतासाठी लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा