सात बकऱ्या केल्या ठार, परिसरात पसरली दहशत
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
चिखली तालुक्यातील कव्हळा येथील अत्यल्प भूधारक शेतकरी राजेंद्र लालसिंग महाले यांनी गोठ्यात बांधून ठेवलेल्या सात बकऱ्या बिबट्याने ठार केल्याची घटना घडली.
तालुक्यातील कव्हळा येथील राजेंद्र महाले यांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची आहे. कुटुंबात केवळ अडीच एकर शेती असून, तीसुद्धा त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे. अशास्थितीत घर चालविण्यासाठी राजेंद्र महाले यांनी मोलमजुरीसह शेळीपालनाचा पर्याय निवडला. मोठ्या मेहनतीने व कष्टाने त्यांनी दहा बकऱ्या वाढविल्या. यासाठी गावापासून साधारण अर्धा किमी अंतरावर गट नंबर १५० मधील डोंगरपांधी रस्त्यावर त्यांनी गोठा बांधला आहे. त्यामध्ये सायंकाळी या सर्व बकऱ्या त्यांनी बांधून ठेवल्या होत्या.
दरम्यान, रात्रीच्या सुमारास या गोठ्यावर बिबट्याने हल्ला चढवून दहा पैकी ७ बकऱ्या ठार केल्याने महाले यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात ४ बोकड व गाभण असलेल्या ३ बकऱ्या, अशा एकूण ७ बकऱ्या ठार झाल्या असल्याने महालेंच्या उदरनिर्वाहावर देखील गदा आली आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास बकऱ्यांना चारापाणी देण्यासाठी गेले असता ही बाब उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे मोरे व संबंधित कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन पंचनामा केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पडोळ यांनी मृत बकऱ्यांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली आहेयावेळी सरपंच रवींद्र डाळीमकर, तंटामुक्ती अध्यक्ष पंडितराव इंगळे आदी उपस्थित होते.
तार कुंपणाची गरज
तालुक्यातील कव्हळा व परिसरातील गावे ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे. अभयारण्यातील बिबट्या, अस्वल आदी वन्यजीवांमुळे या भागातील शेती व शेतकरी कायम जोखमीत असतात. याच आठवड्यात डोंगरशेवली येथील सोमनाथ मंदिरात अस्वलांचा धुमाकूळ घातल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, वन्यजीवांची वाढती संख्या पाहता धोका वाढलेला असून, यापूर्वी अनेकांना जीव देखील गमवावा लागला असतानाही वनपरिक्षेत्राला तार कुंपणाची मागणी अद्यापही प्रलंबित आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा