भेलोंडेनी केली चौकशीची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर
नायगांव तालुक्यातील टाकळी ( बु ) येथे जलजीवन मिशन अंतर्गत "हर घर जल योजना" पाणीपुरवठ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असुन अर्ध्याहून अधिक जुन्याच कामावर नवीन काम पूर्णत्वाकडे नेण्याचा घाट संबंधित गुत्तेदार, सरपंच व ग्रामसेवकांनी चालविल्याचा आरोप करीत होत असलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामाची सक्षम अधिकाऱ्यांकडून त्वरित चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी मारोती माधवराव भेलोंडे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या निवेदनात नमूद केलेल्या माहितीनुसार मौजे टाकळी ( बु ) ता नायगांव येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत "हर घर जल" नळ योजनेची सन २०२१ - २०२२ यावर्षीचे काम चालू असून नवीन अंदाजपत्रका नुसार या योजनेचे काम न करता संबंधित गुत्तेदार व स्थानिक ग्रामपंचायत अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत. गावातील जुन्या विहिरीतून नवीन नळ योजनेची पाईपलाईन करण्यात आली. पाईपलाईनची खोली फार कमी असून विहिरीवर कोणतेही खोदकाम केलेले नाही. अंदाजपत्रकामध्ये विहिरीवर आर सी सी पडदी आहे. ती न करताच जुनी आर सी सी पडदी दाखवून बिले उचलण्यात आली. तीस मीटर आडवा बोर मारला नाही. तर मोटर पॅनल रूमही केले नाही. पाईप लाईन गावापर्यंत पूर्ण काळ्या मातीतून आणल्या गेली. हार्ड मुरूम, सॉफ्ट मुरूम व राॅक दाखवून शासनाची दिशाभूल करण्यात आली.
गावात नळ लाईन ( डिस्ट्रीबुशन ) लाईन तर अत्यंत निकृष्ट दर्जाचे केली असून रस्ता फोडून कमी खोलीवर पाईपलाईन टाकण्यात आली. ती कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून इतर विविध विकास निधीतून सी सी रोड करण्यात आला आहे. प्रत्यक्षात नळ योजनेची पाईपलाईन पूर्ण झाल्याशिवाय आणि संपूर्ण चाचण्या झाल्याशिवाय सी सी रस्ता करायला नको होता. पण रोड फोडून पाईपलाईन झाल्यावर त्याच्यावर नवीन विविध निधीतून सिमेंट रस्ता करण्यात येत आहे. रोड फोडून अंदाजपत्रकात नमूद प्रमाणे जाडीचे काँक्रेट आहे. ते न टाकताच इतर निधीतून रस्ते करण्याचा सपाटा लावला आहे. या महत्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या अंगणात नळ बसविणे गरजेचे आहे. परंतु घरासमोर नळ बसविण्यात आले. ते पूर्णपणे चुकीच्या जागेवर बसविण्यात आले आहेत.
रोडवर नालीच्या जागेवर, रस्त्यावर बसविण्यात आल्यामुळे पाणीपुरवठा चालू होण्या अगोदरच नळांना वाहनाचे धक्के बसत असल्यामुळे ते तुटले आहेत. या होत असलेल्या निकष कामाची वारंवार देखील तक्रार करूनही त्याची दखल घेत नसल्याने मारोती माधवराव भेलोंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली असून या निकृष्ट दर्जाच्या कामाची सक्षम अधिकाऱ्यां मार्फत चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, औरंगाबादचे आयुक्त, नांदेडचे जिल्हाधिकारी, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे राज्याचे सचिव यांना पाठवल्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा