सहा लाख रुपये व मोबाइल असा १३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
आरिफ शेख सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी शिवशाही वृत्तसेवा
देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई फाट्याजवळ कार अडवून जालन्यातील राजुरी स्टील कंपनीतील चालक व वसुली अधिकाऱ्याकडून २७ लाखांची रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांचा जालना स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणी पाच दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. केलेल्या तपासात कंपनीच्याच एका कामगाराने दरोडेखोरांना जीपीएस लोकेशन सांगून हा दरोडा घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या कारवाईत आरोपींकडून सहा लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली एक कार जप्त करण्यात आली आहे. या दरोडेखोरांना अंढेरा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
जालना येथील लोखंडी सळया निर्मितीच्या उद्योगात प्रसिद्ध असलेल्या राजुरी कंपनीचे वसुली अधिकारी रामेश्वर श्रीमाली हे बुलढाणा जिल्ह्यात वसुली करण्यासाठी येतात. वसुली करून चालकासह ते १४ फेब्रुवारीच्या रात्री जालन्याकडे निघाले होते. मात्र, तालुक्यातील अंढेरा घाटामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचे वाहन अडविले. महामार्गापासून आडवळणाच्या रस्त्याने नेऊन
त्यांच्याजवळील २७ लाख रुपये लुटण्यात आले. तसेच आरोपींनी दोघांचेही मोबाइल फोन फेकून दिले होते. दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधले होते. दरम्यान, या प्रकरणी अंडेरा पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच हे दरोडाकांड जवळच्याच व्यक्तीच्या माध्यमातून झाले असावे, असा दाट संशय सुरुवातीपासूनच होता. जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी तपासचक्रे फिरवून दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला.
हा दरोडा टाकण्याची टीप कंपनीतील एका कामगारानेच दिली होती. तसेच कंपनी मालकाला माहिती होऊ न देता वसुली अधिकाऱ्याच्या वाहनांना जीपीएस बसवून त्याचे लोकेशन व इत्यंभूत माहिती दरोडेखोरांना पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, एपीआय योगेश उबाळे, शांतीलाल चव्हाण, पीएसआय राजेंद्र वाघ, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, भाऊराव गायके, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रमेश राठोड, सतीश श्रीवास, रुस्तुम जैवळ, आक्रूर धांडगे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, संभाजी तनपुरे, विजय डिक्कर, योगेश सहाने, धीरज भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
गुन्ह्यात पंधरा जणांच्या टोळीचा सहभाग पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या तपास पथकाने केलेल्या तपासात हा दरोडा पंधरा दरोडेखोरांच्या टोळीने घातल्याचे उघड झाले आहे. यापैकी पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या दरोडेखोरांच्या ताब्यातून एक कार, सहा लाख रुपये व मोबाइल असा १३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावून त्यांना गजाआड करण्याची मोहीम पोलिसांनी फत्ते केली.
आरोपीची नावे खालील प्रमाणेकचरू श्रीकिसन पडूळ (३५, मम्मादेवीनगर, जालना), विष्णू गोविंद बनकर (३८, दरेगाव, ता.जि. जालना), दारासिंग बाबुसिंग राजपूत (४६, मोरांडी मोहल्ला जुना जालना) व सुनील शिवाजी धोत्रे (३०, मदनेश्वरनगर, नेवासा, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. तसेच यातील पाचवा आरोपी बहादूर सुख्खुप्रसाद पासवान (४०, चंदोली, ता. सखलदिया, जि. चंदवली, उत्तर प्रदेश ह.मु. राजुरी स्टील कंपनी, जालना) हा स्टील कंपनीमधील कामगार आहे. २० फेब्रुवारीला पहाटे सहा वाजता जालन्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर एका हुंद्याई व्हॅरना कारमध्ये पाच जण आढळून आले होते. कसून चौकशी केली असता आरोपींनी लुटमारीना गुन्हा कबूल केला.----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा