ग्रामसेवकाचा केला पाणउतारा : बुथअंतर्गत शाळांची केली पाहणी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा, तालुका प्रतिनिधी, आरिफ शेख
निवडणुकीच्या दृष्टीने बुथ पाहणी करत असताना मलकापूर पांग्रा येथील शाळेत अनेक समस्या दिसून आल्याने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील चांगलेच संतापले. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय नाही, प्रांगणात साचलेले गटार आणि अस्वच्छता पाहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाचा चांगलाच पाणउतारा केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात बुथ पाहणी केली. यावेळी मलकापूर पांग्रा येथील माराठी प्राथमिक शाळेतील बुथची पाहणी केली. यावेळी शाळेत पिण्याचे पाणी तसेच शौचालयाची व्यवस्था नव्हती. शाळेसमोर घाण पाण्याचे डबके साचलेले होते. समोरच उकीरडा दिसून आला. या सर्व समस्या पाहून जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी संताप व्यक्त केला. ग्रामसेवक कुठे आहे म्हणून त्यांना चांगलेच झापले. तातडीने सर्व सोयी, सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशा सूचना केल्या.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार सचिन जयस्वाल यांना घेऊन बुथची पाहणी केली. मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक शाळेच्या बुथ केंद्रावर जाऊन मतदान केंद्राची पाहणी केली असता विदारक चित्र त्यांना पाहायला मिळाले. यामुळे जिल्हाधिकारी चांगलेच संतापले आणि ग्रामसेवकाची कानउघाडणी केली. शासन स्वच्छ भारत अभियान राबवित असून या ठिकाणी स्वच्छतेचे पूर्ण धिंडवडे निघाल्याचे बघून त्यांनी ताबडतोब ग्रामसेवक कोठे आहे, असा प्रश्न विचारला. ग्रामसेवकास तातडीने शो कॉज देण्याबाबत अधिकाऱ्यांना बजावले. तसेच पिण्याच्या पाण्यासह शौचालयाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष हनीफ बागवान यांनीदेखील गावाच्या समस्या मांडल्या. अनेक योजना कागदावर असल्याचे ते म्हणाले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या मार्गी लावाव्या, अशा सूचना केल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा