मातृतीर्थ सिंदखेडराजात जिजाऊभक्तांचा जनसागर उसळला
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा आज मोठ्या थाटात साजरा होत आहे. यानिमित्ताने जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत सकाळपासून अलोट गर्दी लोटली आहे. सकाळी ६ वाजता लखोजीराजे जाधवांच्या राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानी महापूजा संपन्न झाली. आज दिवसभरात सिंदखेडराजा नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सकाळी ६ वाजता लखोजीराजे जाधवांच्या वंशंजांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. जिल्हा प्रशासन, नगरपरिषद प्रशासनाकडून देखील विधिवत पूजा करण्यात आली. खासदार प्रतापराव जाधव , रविकांत तुपकर यांनीदेखील जिजाऊंचरणी माथा टेकला. आज पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी मातृतीर्थ सिंदखेडराजात येणार आहेत. याशिवाय जिजाऊसृष्टीवर मराठा सेवा संघाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या भाषणाकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान सिंदखेडराजात गर्दी होत असल्याने असुविधा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन ,जिल्हा प्रशासन मेहनत घेत आहे. नगरपरिषद प्रशासनाने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. वाहतूक पोलिसांवर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय विविध सामाजिक संस्थांनी ठीकठीकणी भोजनाचे व पाण्याचे स्टॉल लावले आहेत.
अशी आहे पार्किंग व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्तपोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी आणि अशोकअशोक थोरात बंदोबस्त प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या दिमतीला २ उपविभागीय पोलीस अधिकारी,१८ पोलीस निरीक्षक,३६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक,३८० पोलीस अंमलदार, ५१ महिला पोलीस अंमलदार, ३० साध्या वेशतील पोलीस कर्मचारी व २ दांगाकाबु पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय शेजारील जिल्ह्यातूनही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा