जिजाऊ मॉसाहेबांचा जन्मोत्सव, विवेकानंद यात्रोत्सवावर कोरोनाचे सावट
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा येथे गेल्या तीन दिवसांत कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला असून, त्यामुळे येत्या १२ जानेवारीरोजी साजरा होणार्या राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवावर तसेच हिवरा आश्रम येथील विवेकानंद जन्मोत्सवावर चिंतेचे सावट पसरलेले आहे. त्यातच पुरातत्व खात्याने मॉसाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळाची स्वच्छता व योग्य ती निगा न राखल्याने जिजाऊ मॉसाहेबांच्या वंशजांसह बहुजन समाजात संतापाची तीव्र लाट पसरली आहे.
गेल्या तीन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात नव्याने सात कोरोना बाधितांची भर पडली आहे. आता एकूण ८ कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. हे रुग्ण कोरोनाच्या जेएन.१ या नव्या व्हेरिएंटचे आहेत. त्यातच येत्या १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ मॉसाहेबांचा जन्मोत्सव सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात संपन्न होणार आहे. मात्र जिजाऊ मॉसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या या राजवाड्याची पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे मॉसाहेबांच्या वंशजांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या १० जानेवारीपर्यंत राजवाड्याची सुधारणा केली नाही तर आंदोलन करू, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा