राष्ट्रमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
भारतात धर्माला अनुसरून अनेक पुराण कथा आहेत. सगळ्याच पुराण कथा या खर्या नसतात किंवा खोट्याही नसतात. तर्कशुद्ध बुद्धीने त्याचा अर्थ लावणे गरजेचे आहे. पुराणातून जे बुद्धी प्रमाण्यवाद विचार असतील ते घेणे गरजेचे आहे. मिथक म्हणजेच पुराण कथा होय असा खुलास व्याख्याते प्रा.डॉ.अशोक राणा यांनी हिंगोली येथे राष्ट्रमाता जिजाऊ व्याख्यानमालेत बोलताना गुरूवारी केला.
येथील कै. खासदार शिवाजीराव देशमुख सभागृहात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षातील दुसरे पुष्प 4 जानेवारी रोजी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंडेराव सरनाईक, उद्घाटक म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील, प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, बाबाराव श्रृंगारे, नीरज देशमुख यांची उपस्थिती होती. मिथक म्हणजे काय? या विषयावर पुढे बोलताना प्रा. डॉ. अशोक राणा म्हणाले की, आपण अनेक लोककथा ऐकल्या आहेत. त्या एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच मिथ्य कथा म्हणजे मिथ्या संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ खोटा असा होतो.
प्रत्येक धर्मात आपल्याला अश्या पुराण कथा पहायला मिळतात. मात्र याची देवाधर्माशी नाळ असल्याने त्याच्यावर तर्कशुद्ध विचार करणे किंवा आक्षेप घेणे चुकीचे मानले जाते. मात्र ज्या पुराण कथा लिहून ठेवल्या त्यावर तर्कशुद्ध पुराव्यानिशी मांडणी झाली पाहिजे. त्याचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. तेव्हाच पुराणातील सत्य बाहेर येईल व जे बुद्धीला पटणारे आहे ते स्विकारता येईल व बाकीचे नाकारता येईल. कलयुगाबाबत बोलताना ते म्हणाले की, 5 हजार वर्षापुर्वी कलयुग सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. ती परंपरा आजही आपण पुढे चालवतो. पुराणात देव, राक्षस, डाकीन असे विविध पात्र आपल्याला पहायला मिळतात. मात्र पुराण कथा रचताना सोयीने या पात्राचे चरित्र रेखाटण्यात आले आहे. ही पात्रे बहुजनाशी निगडीत आहेत. गणपतीबाबत बोलताना ते म्हणाले की, गण म्हणजे लोकशाही व्यवस्थेतील लोक, गणपती म्हणजे गणाचा प्रमुख. त्या वेळी अनेक गण अस्तित्वात होते. गणव्यवस्थेत लोक एकत्र बसून निर्णय घेतात. तर राज व्यवस्थेत राजाप्रमुख असतो. कधी तो हुकूमशहाही असू शकतो. अनेक संदर्भ ग्रंथ व पुराणकथा संदर्भातील अतिशय क्लिष्ट विषय डॉ. राणा यांनी सोप्या भाषेत श्रोत्यांना समजून सांगितला.
मिथक हा इतिहास नाही. इतिहासाला पुराव्याचा आधार असतो त्यामुळे कोणतेच पुराण हे खरे नसतात किंवा खोटे नसतात. आपण ते तर्कशुद्ध बुद्धीने स्विकारले पाहिजे असे आवाहनही डॉ. प्रा.अशोक राणा यांनी केले. व्याख्यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरेही डॉक्टर राणा यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर लोंढे, जिजाऊ वंदना भाग्यश्री दत्ता पडोळे, प्रास्ताविक खंडेराव सरनाईक, व्याख्यात्यांचा परिचय प्रा.डॉ. दत्ता सावंत, आभार सुनिल चौधरी यांनी मानले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते व्याख्यानमालेला आर्थिक सहकार्य करणार्या वंदना आखरे, प्रा.डॉ. मनिषा गवळी (अवचार), प्रा.माणिक डोखळे, विश्वासराव वानखेडे, प्रा. शालिकराम शिंदे, प्रा.डॉ. नवीन वसेकर, प्रा.डॉ. वसंतराव गाडे, दिनकरराव पिसे, शिवाजीराव मेटकर, माधवराव वायचाळ, हनुमंतराव सावंत, सुधाकर बल्लाळ, रामदास कावरखे, पंडीत सिरसाट यांचा सत्कार करण्यात आला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा