बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन दे
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा येथे महिला ग्रामसंघाच्या बैठकीत बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन करण्यात आले. आजची बचत हीच उद्याची आर्थिक तरतूद असते, असे मार्गदर्शन करत बचत गटांच्या माध्यातून आर्थिक समृद्धीची वाट याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक शिवहरी झोटे यांनी उलगडून दाखवली.
सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा येथे महिला ग्रामसंघाची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्या विमल कायंदे होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्राचार्य शिवराज कायंदे, ग्रामपंचायतीचे ग्रामसचिव तथा आदर्श ग्रामसेवक विनोद सातपुते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक शिवहरी झोटे, ईश्वर दळवी हे उपस्थित होते. यावेळी झोटे यांनी उपस्थित सर्व बचत गटांच्या महिलांना बचत गटाचे महत्त्व, फिरता निधी, कर्जाचा उपयोग कसा करायचा, वेळेची व पैशाची बचत कशी करायची.
त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बचत गटांनी कसे प्रयत्न करावेत, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, आजची बचत ही उद्या भविष्याची फार मोठी मदत ठरू शकते, यासाठी प्रत्येकाने बचत करणे काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले, तसेच प्रत्येक बचत गटातील महिलांनी स्वतःचा विमासुद्धा काढून घ्यावा, हे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला माजी सरपंच धनश्री कायंदे, ज्योती कायंदे, गोकर्ण पाखरे यांच्यासह सर्व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार आदर्श व लोकप्रिय ग्रामसेवक विनोद सातपुते यांनी मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा