रौप्य महोत्सवी जिजाऊ व्याख्यानमालेचा समारोप
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
सन 2000 सालापासून हिंगोलीत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून राष्ट्रमाता, राजमाता मॉ साहेब जिजाऊ व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेत अनेक वक्त्यांनी विचार व्यक्त केले आहेत. या वर्षी आपण रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सामाजिक एक्य, शांतता, एकात्मता आणि समानतेचा संदेश देण्याचे काम झाले आहे असे गौरवोद्गार मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी व्याख्यानमालेच्या प्रबोधनपर्व स्मरणिका विमोचन कार्यक्रमात बोलताना शुक्रवारी काढले.
येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तिसरे पुष्प 5 जानेवारी रोजी पार पडले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, उद्घाटक पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, व्याख्याते अॅड. गणेश हलकारे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील, खंडेराव सरनाईक यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले की, व्याख्यानमालेच्या इतिहासातील महत्वाचा दस्तावेज प्रबोधनपर्व स्मरणिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे.
व्याख्यानमालेमुळे शहराचा आणि परिसराचा वैचारिक चेहरा-मोहरा बदलण्याचे काम झाले आहे. व्याख्यानातून सर्वधर्म समभावाची बिजे रोवण्यात आली आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेव्यतिक्त कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना स्पर्धा परिक्षेचे धडे दिले पाहिजेत. बालकांच्या संगोपनात आईचा मोठा वाटा असतो. त्यामुळे महिलांचे परिवर्तन होणे गरजचे आहे. स्त्रीचे भवितव्य बदलले तर देशाचे भवितव्य बदलत असते असेही पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले.
उद्घाटकीय मनोगतात बोलताना पोलीस अधिक्षक जी. श्रीधर म्हणाले की, अभिनंदनीय व्याख्यानमाला आपण सुरू ठेवली आहे. समाजात अशा कार्यक्रमाची गरज आहे. यामधून सामाजिक प्रेरणा मिळते. त्याचबरोबर सोशल मिडीयाचाही सर्वांनी काळजीने वापर केला पाहिजे व अशा प्रकारच्या जास्तीत जास्त कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेेचे आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा