जिजाऊ व्याख्यानमालेत सिमाताई बोके यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
जिजाऊ सावित्री, रमाई, अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत नेत्रदिपक कार्य केले आहेत. आज आपण विज्ञानवादी एकविसाव्या शतकात असतानाही कर्मकांड आणि अंधश्रद्धेत गुरफटल्या गेलो आहोत. महापुरूषांचा विचार अंगीकारून सत्य, असत्य या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर चौकसपणे तपासून पाहिल्या पाहिजे तरच महिलांची प्रगती शक्य आहे असे प्रतिपादन राष्ट्रमाता जिजाऊ व्याख्यानमालेत बोलताना बुधवारी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा व्याख्यात्या सिमाताई बोके यांनी केले आहे.
येथील कै.खासदार शिवाजीराव देशमुख सभागृहात 3 जानेवारी रोजी राष्ट्रमाता, राजमाता मॉ साहेब जिजाऊ व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पहिले पुष्प पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील, उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, प्रमुख उपस्थिती म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय संघटक सुनिताताई मुळे, प्रदेश संघटक डॉ. शितल कल्याणकर, जिल्हाध्यक्षा कांता कल्याणकर, वर्षा सरनाईक, प्रदेश कोषाध्यक्ष संजीवनी बाजड, शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखा देवकते आदींची उपस्थिती होती.
एकविसाव्या शतकातील महिलांचे अपेक्षित वर्तन या विषयावर पुढे बोलताना व्याख्यात्या सिमा बोके म्हणाल्या की, सोळाव्या शतकात राष्ट्रमाता जिजाऊ यांनी दोन छत्रपतींनी घडविले. महात्मा फुले यांच्या खंबीर साथीने सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. मात्र आज आपण शिक्षण घेऊन कर्मकांड व बुवाबाजीत अडकलो आहोत. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडला जात आहे. मनिपूर येथे घडलेल्या घटनेवर किती महिन्यांनी आवाज उठविला. महिला खेळाडुंवरील झालेल्या अन्यायाच्या विरोधात आपण उभे राहिलोत का असा प्रश्नही बोके यांनी उपस्थित केला.
आज आपण पीएचडी सारखे शिक्षण घेतो मात्र महिलांवरील अन्याय, अत्याचारावर बोलतो का ? महिलांनी अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी संघटीतपणे एकत्रित आले पाहिजे. मुलींना संस्काराबरोबर संरक्षणाचे धडेही दिले पाहिजे. वर्तवैकल्यातून बाहेर येऊन इतिहासातील महानायीकांचे विचार अंगीकारले पाहिजेत तेव्हाच एकविसाव्या शतकातील अपेक्षित महिला घडू शकते.
आपल्याला दहा महाराजांचे नावे माहीत आहेत मात्र दहा शास्त्रज्ञांची नावे विचारली तर सांगता येणार नाहीत. यासाठी शिक्षणाचा योग्य उपयोग करून जिजाऊ - सावित्रीचे विचार महिलांनी अंगीकारले पाहिजेत असे आवाहन सिमा बोेके यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन अंजली बोरकर, अर्चना मेटे, जिजाऊ वंदना उमा जगताप, प्रास्ताविक कांताबाई कल्याणकर तर पाहुण्यांचा परिचय शितल सावके, आभार रोहिणी पानपट्टे यांनी मानले.
पुरूषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन
मराठा सेवा संघाच्या वतीने इ.स.2000 पासून अखंडीतपणे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला सुरू आहे. यावर्षी व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने 25 वर्षाच्या व्याख्यानमालेचा इतिहासाचा लेखा-जोखा म्हणून प्रबोधनपर्व या स्मरणिकेचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत 5 जानेवारी रोजी विमोचन करण्यात येणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्याते अॅड. गणेश हलकारे मार्गदर्शन करणार आहेत.
मराठा सेवा संघाचा कौतुकास्पद उपक्रम - राजश्री पाटीलमराठा सेवा संघाने अविरतपणे गेल्या 24 वर्षापासून प्रबोधनाची चळवळ चालविली आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विचाराची पिढी घडविण्याचे काम सुरू आहे. एखादा उपक्रम अखंडीतपणे चालविणे सोपे नसते. मात्र ते सेवा संघाने शक्य केले आहे. खासदार हेमंत पाटील चळवळीतूनच पुढे आले आहोत. कर्तृत्व, नेतृत्व व मातृत्वाच्या उतुंग आदर्श देणार्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचाराने हे शक्य होत असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात बोलताना राजश्री पाटील यांनी व्यक्त केले असून सेवा संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा