पहिला लॅम्प लाईटींग व शपथविधी सोहळा उत्साहात
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
नर्स रुग्णसेवेचे व्रत आणि आरोग्य सेवेचा वसा जपत असतात त्याचप्रमाणे त्यांनी रुग्णांची व समाजाची विश्वासार्हता जोपासावी, नर्स यांनी रूग्ण संवाद शैली विकसित केली पाहिजे. रूग्ण सेवे सारखे पुण्य नाही असे प्रतिपादन संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रितिश परिचारक यांनी केले. कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाने आयोजित केलेल्या पहिल्या लॅम्प लाईटींग व शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला यामधे डॉ. प्रितिश परिचारक बोलत होते. लॅम्प लाईटींग व शपथविधी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यश इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अनिल काळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून शिवाई नर्सिंग कॉलेज उमरगाचे प्राचार्या प्रा.अल्विन काळे, संस्थेचे चेअरमन रोहन परिचारक, प्राचार्य डॉ. अजित कणसे, प्राचार्या दीपा पाटील , रजिस्ट्रार गणेश वाळके उपस्थित होते.
या कार्यक्रमात जी.एन.एम प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी दीपप्रज्वलन करीत आरोग्य सेवेची शपथ घेतली. छोटेखानी समारंभात सेवेचा भाव व्यक्त करण्यात येत होता. यावेळी प्रमुख पाहुणे अनिल काळे यांनी या क्षेत्रातील विविध संधी यांची माहिती दिली. नर्सिग मध्ये देखील डॉक्टरेट मिळवता येते, त्यासाठी आवश्यक असणा-या सर्व संधी आपल्या देशात उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी स्वागत समारंभ,पोषण आठवडा (स्वयंपाक स्पर्धा), जागतिक एड्स जागरूकता (पथनाट्य सादरीकरण), जागतिक मानसिक आरोग्य दिन (पोस्टर सादरीकरण) निमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले .त्याच बरोबर समूह गीत व सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . कीर्ती गंदले यांनी सूत्रसंचालन केले. नितीन कांबळे यांनी आभार मानले तर ओंकार बागल हनुमंत अटक, हनुमंत डोंगरे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा