७ जानेवारीला नांदेड येथे होणार पुरस्कार प्रदान सोहळा
मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखिका , जेष्ठ कवयित्री प्रा. डॉ. संध्या रंगारी यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ' क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार ' जाहीर झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयातील प्राध्यापिका , मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवयित्री, ललित लेखिका प्रा. डॉ. संध्या रंगारी यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल , स्त्रीवादी साहित्यातील लिखाणाबद्दल त्यांना ' क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार ' जाहीर करण्यात आला आहे .
हा पुरस्कार त्यांना 7 जानेवारी रोजी नांदेड येथील सावित्री - रमाई महोत्सव 2024 या आयोजित सोहळ्यात वितरित करण्यात येणार आहे. बुद्धिस्ट रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित सावित्री रमाई महोत्सव नांदेड येथील शंकराव चव्हाण प्रेक्षागृहात संपन्न होत आहे. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बी.आर. फाउंडेशनचे संस्थापक कोंडदेव हटकर , अध्यक्ष सुमेधा हटकर, सचिव अर्चना गवारे यांनी पत्राद्वारे दिली आहे. यापूर्वीही साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ.संध्या रंगारी यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या एकूण साहित्याची दखल घेत 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार ' देण्यात येत असल्याची माहिती संयोजकांनी पत्राद्वारे दिली आहे.प्रा.संध्या रंगारी यांची कवितासंग्रह, कथासंग्रह,ललितसंग्रह, संपादीत अशी विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत.देशातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा