सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पर्यवेक्षक व प्रगणकांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा , हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली , दि. 20 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने आज येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील 182 पर्यवेक्षकांना जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार उपस्थित होते.
मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात 182 पर्यवेक्षक व 3 हजार 575 प्रगणकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यासाठी 55 पर्यवेक्षक व 877 प्रगणक, सेनगाव तालुक्यासाठी 20 पर्यवेक्षक व 444 प्रगणक, कळमनुरी तालुक्यासाठी 39 पर्यवेक्षक व 570 प्रगणक, वसमत तालुक्यासाठी 52 पर्यवेक्षक व 808 प्रगणक आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 26 पर्यवेक्षक व 896 प्रगणकाचा समावेश आहे.
हे सर्व पर्यवेक्षक व प्रगणक घरोघरी जाऊन आवश्यक ती माहिती गोळा करणार आहेत. या सर्व पर्यवेक्षकांना व प्रगणकांना तालुकास्तरावर दि. 21 व 22 जानेवारी, 2024 रोजी दोन दिवशीय तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर दि. 23 जानेवारी, 2024 पासून प्रत्यक्षात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पर्यवेक्षकांना व प्रगणकांना आवश्यक ती माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा