साक्षात तुकोबारायांचा प्रसाद म्हणून हा पुरस्कार स्वीकारत आहे - पांडुरंग महाराज घुले
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रेरणेने व अनेकांच्या सहकार्यातून देहू येथे गाथा मंदिर उभारण्यात आले असून आज मिळालेला वारकरी पुरस्कार हा साक्षात तुकोबारायांचा प्रसाद म्हणून स्वीकारत असल्याचे भावोद्गार पांडुरंग महाराज घुले यांनी व्यक्त केले.
वै. ह.भ.प. तात्यासाहेब वासकर यांच्या स्मरणार्थ वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विभूतीस मागील 25 वर्षापासून वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी 26 वा वारकरी पुरस्कार प्रसिद्ध कीर्तनकार तथा देहू येथे गाथा मंदिर उभा करून वारकरी संप्रदायाचा देश-विदेशात प्रचार करणारे पांडुरंग महाराज घुले यांना प्रदान करण्यात आला. येथील काळा मारुती मंदिरा नजीक असणाऱ्या वासकर वाड्यात शंकर महाराज बडवे यांच्या हस्ते व विठ्ठल महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमास केशव महाराज नामदास, भागवत महाराज शिरवळकर, सोपान काका टेंभूकर, भागवत महाराज चवरे, नामदेव महाराज लबडे, वैभव महाराज राक्षे, बंडा महाराज कराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर पुरस्कार संत गोरोबाकाका ट्रस्ट वाणेवाडी, संत सेवा संघ सातारा, ज्ञानराज प्रतिष्ठान मुंबई व वासकर फड यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवण महाराज लामतुरे यांनी, सूत्रसंचलन प्रमोद महाराज जगताप केले तर आभार अक्षय महाराज भोसले यांनी मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा