बिलोली तालुक्यातील आदमपूर फाट्यावर घडली घटना
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
बिलोली तालुक्यातून जाणाऱ्या देगलूर-नांदेड राज्य महामार्गावर आदमपूर फाटा येथे मोटरसायकल व ट्रक ट्रेलर मध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकलवर बसलेल्या सोनूबाई शिवाजी चिंतले (३९) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती शिवाजी चिंतले हा गंभीर जखमी झाला आहे.
बिलोली तालुक्यातील खतगाव येथील सोनूबाई शिवाजी चिंतले (३९) ही आपल्या पती शिवाजी चिंतले यांच्यासोबत मोटरसायकल लुना क्रमांक एम.एच. २६ बि.आर. ९९३९ वर बसून ता.१५ बुधवारी दिपावलीच्या भाऊबीज दिवशी खतगाव येथून दुपारी साडे तीन वाजता दिपावलीच्या खरेदीसाठी नायगाव कडे जात असताना बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा येथे दुपारी ३:४५ वाजता आले असता. तेथून नायगाव कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर वळण घेत असताना आदमपूर फाट्यावरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या लगत अतिक्रमण मध्ये असलेल्या एका टिन पत्रे मारून उभा केलेल्या हॉटेलमुळे नायगाव कडून येणाऱ्या ट्रक ट्रेलर क्रमांक जी.जे. २७ व्ही ८३०९ या वाहन चालकास समोरून वळण घेऊन येणारा मोटरसायकलस्वार दिसला नसल्याने व मोटरसायकलस्वारास त्याच हॉटेलमुळे नायगाव कडून येणारा ट्रक ट्रेलर नजरेस पडले नसल्याने व तसेच या ठिकाणी रस्ता गतिरोधक नसल्यामुळे मोटर सायकल लुना व ट्रक ट्रेलर मध्ये सामोरा समोर अपघात झाला.
सदरच्या अपघातात मोटरसायकल वर बसलेली सोनूबाई शिवाजी चिंतले (३९) हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती जागीच ठार झाली तर तिचा पती शिवाजी चिंतले हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती रामतीर्थ पोलिसांना मिळताच पोलिस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे व बीट जमादार डि. के. जांभळीकर हे घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करत जखमीला दवाखान्यात पाठवत मयत महिलेस खतगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. नातेवाईकाने त्याच दिवशी मयत महीलेवर शोकाकुल वातावणात रात्री साडेदहा वाजता खतगाव येथे अंत्यसंस्कार केले. मयत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा