अपघात भयंकर मात्र सुदैवाने जीवित हानी नाही
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते विजयराज शिंदे यांच्या गाडीला अपघात झाल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड पोलीस देखील किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
माजी आमदार विजयराज शिंदे हे त्यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड पोलीस यांच्यासह आपल्या MH 28 AN 2757 क्रमांकाच्या इनोवा गाडीने अमरावतीला निघाले होते. अकोला-मुर्तिजापूर महामार्गावरील कुरणखेड येथे आले असता समोरून येणाऱ्या कारंजा अकोला बसला त्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. हा अपघात इतका भयंकर होता की इनोव्हा गाडीचा समोरचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मात्र सुदैवाने गाडीतील एअर बॅग वेळीच उघडल्या त्यामुळे भीषण अपघात होऊनही माजी आमदार विजयराज शिंदे यांना किरकोळ मार लागला आहे. तर त्यांचे स्वीय सहाय्यक वैभव ठाकरे आणि बॉडीगार्ड पोलीस कॉन्स्टेबल चवरे हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. माजी आमदार विजयराज शिंदे यांना उपचारासाठी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे. तसेच या अपघातात जखमी झालेले त्यांचे स्विय सहाय्यक वैभव ठाकरे आणि बॉडीगार्ड पोलीस कॉन्स्टेबल चवरे यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा