छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली खंत
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (शहर प्रतिनिधी जगदीश कोरीमठ)
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक काळ सक्रिय असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाळीस वर्षे राजकारणात सक्रिय असूनही मराठा आरक्षणाबाबत दुर्लक्ष केले असल्याचे आश्चर्य वाटते असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे मतही त्यांनी मांडले. उदयनराजे भोसले मंगळवारी त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केला आहे.
गेली 40 वर्षे मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र शरद पवार यांच्या सत्ता काळात सुद्धा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबितच राहिला ही दुर्दैवी बाब आहे. खरे तर त्याचवेळी आरक्षणाचा प्रश्न सुटणे गरजेचे होते, परंतु पवार साहेबांनी या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले अशी खंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. आरक्षणाचे राजकारण न करता सर्वपक्षीय आमदारांनी आणि मंत्र्यांनी एकत्रित बसून हा विषय तातडीने मार्गी लावावा अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली. काही मंडळी आरक्षणाचा मुद्दा पद्धतशीरपणे बाजूला सारून या मुद्द्यावर चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहेत असेही उदयनराजे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा