मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन साजरा - उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा विशेष सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
मराठा सेवा संघाचा तेहतिसावा वर्धापन दिन पंढरपुरात साजरा करण्यात आला. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मराठा सेवा संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य उत्तम बापू माने, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची चेअरमन अभिजीत पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण राज घाडगे, संत तुकाराम साहित्य परिषदेच्या विभागीय कार्याध्यक्ष सुमनताई पवार, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दत्ता ताड, करकम ग्रामपंचायत सदस्य विवेक शिंगटे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष स्वागत कदम, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला राजमाता जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा चे पूजन करून, मासाहेब जिजाऊ वंदना गायन करण्यात आले. मराठा सेवा संघ पंढरपूर अध्यक्ष नितीन जाधव सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मंचावर उपस्थित मान्यवरांचा स्वागत तर सत्कार झाल्यानंतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध समाज घटकांचा सन्मान करण्यात आला. प्रफुल्ल कुमार गोडसे, रमेश जाधव, चव्हाण, विठ्ठल जगताप, प्रवीण नागणे, कमलेश खाडे, दत्तात्रय यादव, सुनील पवार, वर्षा बरबडे पाटील, राजेंद्र लेंडवे, डॉक्टर रवी आहेर, व चंद्रकांत दिघे यांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू अक्कूताई उलभगत यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. येत्या काळात ऑलिंपिक मध्ये पदक मिळवून पंढरपूर व आपल्या समाजाचे नाव जगभरात पोचवायचे आहे असे अक्कूताई उलभगत यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. याच कार्यक्रमात आपल्या दोन्ही मुलांना एमबीबीएस ला प्रवेश मिळवून जीवन कारकीर्द घडवणारे जबाबदार वडील म्हणून पांडुरंग धुमाळ गुरुजी, आणि आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल हनुमान विद्यालय तांदुळवाडी येथील शिक्षक नवनाथ कोडग सर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
"मराठा सेवा संघ समाजासाठी अतिशय उत्तम काम करत असून, मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, मुलींचे वसतिगृह, याबाबत आग्रही आहे. या सर्व कामात मी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे." असे प्रतिपादन चेअरमन अभिजीत पाटील यांनी या कार्यक्रमात केले.
मराठा सेवा संघ वर्धापन दिनाच्या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर जिल्हा इंग्रजी अध्यापक संघाचे उपाध्यक्ष आगतराव भोसले सर यांनी केले तर मराठा सेवा संघ पंढरपूर कार्याध्यक्ष धनाजीराव मस्के यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मंचावरील मान्यवरांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम एन गायकवाड, ह.जा.भोसले, नितीन पाटील, रा.रा. भोसले, राजेंद्र आसबे, देशमुख गुरुजी, नितीन आजबे, भगतराव भोसले, यांनी तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा