मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी सोडले उपोषण
शिवशाही वृत्तसेवा, जालना (जिल्हा प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण)
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज उपोषण सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी फळाचा रस घेऊन हे उपोषण मागे घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला.
मराठा अरक्षणाबाबतीत मुख्यमंत्री शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असतानाच मंत्रिमंडळातील काही मंत्रीही यावेळी उपस्थित होते. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत, गिरीश महाजन, संदीपान भूमरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हे यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित होते. गेल्या सतरा दिवसापासून जरांगे पाटील करत असलेल्या उपोषण मागे घेण्यासाठी हे मंत्री सतत प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. आता, सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून शिंदे सरकारकडून आरक्षणाचा तिढा आता सुटेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या धाडसाचे कौतुक करत म्हणाले, “मी बाबाला सांगितलं तुझं पोरगं लय भारी आहे. तो स्वत:साठी नाही तर समाजासाठी लढतोय. मनोजला मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो. त्याने वैयक्तीक फायद्यासाठी कोणताही प्रश्न मांडला नाही. तो जेव्हाही मला भेटला तेव्हा त्याने मराठा समाजाबद्दल आग्रही भूमिका मांडली. मी मनोजचं मनापासून अभिनंदनही करतो. एखादं आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं आणि जिद्दीने ते आंदोलन पुढे नेणं, त्याला या महाराष्ट्रात जनतेचा प्रतिसाद मिळणं या सर्व गोष्टी खूप कमी वेळा पाहायला मिळतात. पण ज्याचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असतो त्याच्यामागे जनता उभी राहते.”
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा