शहराध्यक्ष रमेश अण्णा गौड तर युवा शहराध्यक्ष पदी सतीश मोटकुल यांची निवड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
धर्माबाद - दिनांक १४ सप्टेंबर
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सत्र जोरात चालू असून त्याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात भाजपनेही अमुलाग्र बदल केल्याचे दिसून येत आहे. त्यात विशेष म्हणजे नायगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान कार्यसम्राट आमदार राजेश पवार यांनी चांगलीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. एक आमदार दोन कामदार या शब्दा प्रमाणे सातत्यपूर्ण मतदारसंघामध्ये टिकून राहत, नेहमी थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून काम करण्याची कार्यप्रणाली आमदार राजेश पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुनम ताई पवार यांनी कायम ठेवली आहे.
त्याचीच फलश्रुती जणू आज त्यांची भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आमदार राजेश पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते, विजय पाटील डांगे यांची धर्माबाद भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. यासोबतच रुग्न कल्याण समिती सदस्य रमेश अण्णा गौड यांची धर्माबाद भाजप शहराध्यक्षपदी तर सतीश मोटकूल यांची युवा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नायगाव विधानसभा मतदारसंघात इतर राजकीय पक्षांप्रमाणेच भाजपमध्येही आमदार आणि खासदार यांचे दोन गट पडलेले आहेत. तसेच मागील दोन वर्षांपासून चे भाजपचे तालुकाध्यक्ष पद हे खासदार गटाकडे प्रभारी होते. मात्र आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही दिवसांपूर्वी पक्षातर्फे धर्माबाद तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
त्यात एकूण 65 जणांनी मुलाखती दिल्याचे समजते. त्यानंतर तालुकाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते यात आमदार बाजी मारतील की खासदार गटांचे वर्चस्व वाढेल याची उत्सुकता अनेकांच्या मनात होती. हा तिढा अखेर काल सुटला असून नांदेड येथे झालेल्या बैठकीत नांदेड (दक्षिण) जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते उपरोक्त पदांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आणि नायगाव विधानसभा मतदारसंघात आमदारांचे पारडे जड असल्याचे निष्पन्न झालं.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा