दिग्गज गायक, वादक कलाकारांची संगीत सेवा सादर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नांदेड येथील गजानन संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ. सारिका पांडे (अपस्तंभ) व संचालक चेतन पांडे आणि तालयोगी तबला विद्यालयाचे संचालक प्रशांत गाजरे यांच्या संकल्पनेतून व दोन्ही संगीत विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने मागील 8 वर्षापासुन गणेश उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो.
यावर्षी देखील गणेश उत्सव उत्साहात साजरा झाला. यावर्षी दिग्गज गायक, वादक कलाकारांची गायन सेवा सादर झाली. पहिल्या दिवशी गजानन संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली गायन सेवा गणरायासमोर सादर केली. दुसऱ्या दिवशी प्रा. अभिजीत अपस्तंभ व तिसऱ्या दिवशी सुरमणी धनंजय जोशी यांची अप्रतिम शास्त्रीय गायन सेवा झाली. त्यानंतर चौथ्या दिवशी पुणे येथील श्रीपाद लिंबेकर यांचे शास्त्रीय गायन व तालयोगी तबला विद्यालयाचे विद्यार्थी हरिप्रसाद बाळासाहेब पांडे व राघव जोशी यांचे शास्त्रीय तबला सहवादन झाले.
शेवटच्या दिवशी उत्सवाची सांगता ज्येष्ठ गायक संजय जोशी यांच्या सुगम गायनाने झाली. या कार्यक्रमांना तबल्यावर प्रा. डॉ. जगदीश देशमुख, चेतन पांडे व प्रशांत गाजरे यांनी तसेच संवादिनीवर डॉ. प्रमोद देशपांडे, मिहीर जोशी व व्हायोलिनवर, पंकज शिरभाते यांनी उत्कृष्ठ साथसंगत केली. सर्व कार्यक्रमांचे निवेदन सौ. अंबलिका शेटे यांनी केले. सर्व कार्यक्रमांना नांदेड येथील ज्येष्ठ कलाकार व रसिकांची उपस्थिती होती. त्यात प्रामुख्याने गुरूवर्या श्रीमती सीताभाभी, राममोहन राव, रत्नाकर आपस्तंभ, ज्योतिषी श्री. प्रभाकरगुरू आपस्तंभ, भा.ज.पा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. चैतन्यबापू देशमुख जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांची उपस्थिती होती.हा गणेश उत्सव यशस्वी करण्यासाठी गजानन संगीत विद्यालय व तालयोगी तबला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा