नागरिकांना उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
शिवशाही न्यूज वृत्तसेवा,पुणे (जिल्हा प्रतिनिधी अभिषेक जाधव)
पुणे दि १३:- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या 'हर घर तिरंगा' (घरोघरी तिरंगा) उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पालकमंत्री श्री.पाटील यांनी स्वतः उपक्रमाचा शुभारंभ कोथरुडमधील आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन केला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता 'माझी माती माझा देश' या उपक्रमाने होत असून त्याचाच एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत 'घरोघरी तिरंगा' उपक्रम गतवर्षीप्रमाणे राबविण्यात येत आहे. गतवर्षी या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन आपला देशाभिमान व्यक्त करण्यासह स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे, असे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.
९ ऑगस्ट रोजी 'माझी माती माझा देश' अंतर्गत संपूर्ण देशात स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांना स्मरण करून पंचप्रण शपथ घेण्यात आली. गावपातळीवर यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून यात सहभागी होताना पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज आपल्या कोथरुडमधील निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना दिली.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. हजारो स्वातंत्र्य योद्ध्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे या अमृतमहोत्सवी वर्षात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले जात आहे. त्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येकांनी यात सहभागी व्हावे, आणि आपला हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करावा. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या योद्ध्यांचे स्मरण करावे. राष्ट्रध्वज फडकवताना त्याचा सन्मान राखला जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा