शिवशाही वृत्तसेवा , नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सातेगाव येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयातील अंशतः अनुदानित शाळेतील दोन पदे अतिरिक्त झाल्यामुळे सेवाजेष्ठतेनुसार संस्थेने या शाळेतील सहशिक्षक एम एम मठपती व एस एस पल्लेवाड या दोन शिक्षकांना सेवा कनिष्ठ असल्यामुळे अतिरिक्त ठरवले होते.
याबाबत संबंधितांनी आपण मागासवर्गीय असताना अतिरिक्त ठरविल्याबद्दल आक्षेप नोंदवला होता. त्यावर सुनावणी होऊन प्रत्यक्ष समक्ष बोलावून संस्थाचालकांना असे करता येणार नाही हे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी शासन पत्राच्या आधारे संस्थाचालकांच्या निदर्शनास आणून दिले होते. असे असतानाही सदरील संस्थेच्या संस्थाचालकांनी या कर्मचाऱ्यांचे वेतन मागणी करणे अपेक्षित होते.
परंतु संस्थाचालकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून या शिक्षकांची उपासमार सुरू केल्याचा आरोप होत आहे. संबंधित शिक्षकांनी झालेल्या अन्यायामुळे नाराजीने उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता. या दोन शिक्षकांनी मागील महिन्यामध्ये २७ मार्चपासून २८ मार्चपर्यंत दोन दिवसांचे आमरण उपोषण केले होते. विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था मंडळ, सातेगाव तालुका नायगाव या संस्थेच्या सचिवांना दिनांक २७ मार्च २०२३ रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना अतिरिक्त करण्यात येईल असे या कार्यालयास लेखी स्वरुपात कळविले होते.
परंतु संबंधित शिक्षकांचे वेतन अदा झालेले नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी या कार्यालयास पुनश्च विनंती अर्ज केलेला आहे. संस्थेने खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवावे व श्री मठपती एम एम व पल्लेवाड एस एस या दोन शिक्षकांचे वेतन अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधीपथक ( माध्यमिक ) नांदेड यांच्या कार्यालयाकडे सादर करून या शिक्षकांना वेतन अदा करावे असे लेखी आदेश दिले होते. अन्यथा आपल्या शाळेचे एप्रिल २०२३ पासून वेतन स्थगित ठेवण्यात येईल असा इशारा पत्र जा. क्र /जिपना / शिविमां- ८ / २०२२ - २३ / २३१५ अन्वये दिला होता.
परंतु संस्थेने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शिक्षकांची उपासमार सुरू ठेवली आहे. सदरील संस्थेने शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केले नसून या दोन शिक्षकांचे वेतन अद्यापही अदा केलेले नाही. तसेच या शाळेच्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बिल वेतन विभाग नांदेड यांच्याकडे पाठविले आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांनी सदरील शाळेचे वेतन बंद केल्याशिवाय आम्हास न्याय मिळणार नाही अशी विनंती एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे या दोन मागासवर्गीय शिक्षकांना न्याय देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतन अदा करून होणारी उपासमार थांबवावी अशी एका निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेमध्ये अनेक खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजन करण्याच्या प्रकारांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून तणाव निर्माण होत आहेत. अंशतः अनुदानित शाळेमध्ये वर्षानुवर्षे शिक्षक अत्यंत मानधनावर ज्ञानदानाचे कार्य करतात. शाळेला अनुदान प्राप्त झाल्यानंतर मात्र संस्थाचालक व शिक्षक यांच्या देवाण-घेवाणीवरून अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे शिक्षकांना अनेक वर्षे खस्ता खाल्ल्यानंतर सुद्धा वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. अनेक वर्षे हालअपेष्टा सोसून सुद्धा शिक्षकांना हक्काच्या पगारासाठी संघर्ष करावा लागत आहे. ही विदारक स्थिती कधी संपेल असे अनेक विनाअनुदानित शिक्षकांना वाटत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा