सभेत आरोपांच्या फैरी, सभेनंतर मात्र चाय पे चर्चा
पंढरपूर तालुक्यात सध्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे पॅनल एकमेकांसमोर दंड थोपटून उभे आहेत. कार्यक्षेत्रात प्रचाराची धुळ उडत असून प्रचार सभेत एकमेकावर आरोपाचे तोफ गोळे डागले जात आहेत. मात्र या रणधुमाळी मध्ये रोपळे येथे एक वेगळे आणि सकारात्मक दृश्य पाहायला मिळाले.
रोपळे येथे कल्याणराव काळे यांच्या पॅनलची प्रचार सभा पार पडली. रोपळे येथून कल्याणराव काळे यांच्याकडून माजी सरपंच दिनकर कदम हे उमेदवार आहेत, तर अभिजीत पाटील यांच्याकडून विलास उर्फ संजय पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रोपळे येथील प्रचार सभेत सुद्धा अपेक्षेप्रमाणे प्रचंड टीका झाली. काळे पॅनलचे नेते गणेश पाटील यांनी आपल्या भाषणात संजय पाटील यांचा मित्र असा उल्लेख करत त्यांच्यावर देखील टीका केली. मात्र सभा संपल्यानंतर संजय पाटील यांनी गणेश पाटील यांना चहाची ऑफर दिली. गणेश पाटील यांनी देखील दिलदारपणे ऑफर स्वीकारली आणि चहा पिण्यासाठी गेले. यावेळी काळे गटाचे उमेदवार दिनकर कदम, गणेश पाटील, संजय पाटील, बाळासाहेब भोसले, तसेच इतर नेते व कार्यकर्ते यांनी चहाचा आस्वाद घेतला. मनमोकळ्या गप्पा मारत, हास्य विनोद करत, कल्याणराव काळे आणि अभिजीत पाटील दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी एकत्रित चहाचा आस्वाद घेतला.
राजकारण हे निवडणुकीपूर्ती असावे, मतभेद असले तरी कटूता नसावी, ही महाराष्ट्राची संस्कृती, या दोन्ही गटाच्या उमेदवारांनी अमलात आणल्याचे सुखद चित्र यावेळी पाहायला मिळाले. प्रचार सभेच्या मंचावरून एकमेकावर टीकेची राळ उडवणारे आणि आरोपांच्या फैरी झाडणारे नेते, पदाधिकारी सभेनंतर एकत्रित चाय पे चर्चा करत असल्याचे दिसल्याने, महाराष्ट्राची निकोप राजकीय संस्कृती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, असेच म्हणावे लागेल.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा