धार्मिक ऐक्य धोक्यात आणू पाहणाऱ्या विकृतींना आवर घालण्यासाठी कडक पावले उचलावीत
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई
अनेक संतांच्या वास्तव्याने आणि कार्याने पुनित झालेली अध्यात्मिक व सांप्रदायिक भूमी म्हणून पंढरपूरचा तर संतांची भूमी म्हणून मंगळवेढ्याचा संपूर्ण देशामध्ये साजेशा लौकिक आहे. संत परंपरेतील अनेक महान संतांनी आपल्या कार्यातून आणि भागवत धर्माच्या मौलिक तत्वातून या भूमीचा सन्मान आणखी वृद्धिगत केला आहे. भलीमोठी संत विचारांची मांदियाळी असणाऱ्या पंढरपुर येथील तुळशी वृंदावन येथे असणारे श्री संत चोखामेळा यांचे मंदिर कोणी पाडले आहे का ? किंवा स्ट्रक्चरल ऑडिट न केल्याने हे मंदिर पडले आहे का? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
हा सर्व घटनाक्रम लक्षात घेऊन पंढरपूर आणि मंगळवेढा या विधानसभा कार्यक्षेत्राचे लोकप्रतिनिधित्व करत असणारे आमदार समाधान आवताडे यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून सदर मंदिराची पडझड करून धार्मिक ऐक्य धोक्यात आणू पाहणाऱ्या विकृतींना वेळीच आवर घालण्यासाठी योग्य वेळी कडक पावले उचलावीत यासाठी आमदार समाधान आवताडे हे अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये आक्रमक झाल्याचे दिसून आले.
आमदार आवताडे यांनी आपली लक्षवेधी मांडत असताना सांगितले की, भारत देशातील लाखो वारकरी भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई दर्शनासाठी अनेक वारकरी पंढरीमध्ये दाखल होत असतात. देवदर्शनासाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकरी भक्तांना पंढरपूरची अध्यात्मिक पार्श्वभूमी आणि संत विचारांचे कंगोरे पाहायला मिळावेत व दर्शन घेण्यासाठी उपलब्ध व्हावेत यासाठी विविध संतांची मंदिरे पंढरपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये असून त्यापैकी संत चोखामेळा हे मंदिर तुळशी वृंदावन मध्ये आहे.
आपल्या अगाध आणि अढळ भक्तीसाधनेने विठुरायांच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेल्या संत चोखामेळा यांचे मंदिर पाडणे ही कृती संत विचारांचा खूप मोठा अपमान असल्यामुळे वारकरी भक्तांच्या या संदर्भात भावना तीव्र असून यावर योग्य ती कारवाईची पावले लवकरात - लवकर उचलावी अशी मागणी ही आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना केली आहे.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा