महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांचे पदाधिकारी अधिवेशन संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, अहमदनगर (विष्णू मुंगसे, नेवासा)
"पत्रकारांनी आपल्या संपूर्ण क्षमता वापरून समाजात आपली ओळख निर्माण करावी. पत्रकाराच्या प्रश्नांसाठी आपली संघटना काम करत आहे, त्यात आपलेही योगदान असले पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे यांनी केले. ते शिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी अधिवेशनात बोलत होते.
"पत्रकार सगळ्यांचे प्रश्न मांडतो पण पत्रकारांचे प्रश्न कोण मांडणार त्यासाठी संघ काम करतो. आज वर्तमान पत्रांचे अर्थकारण बिघडत आहे. त्यामुळे सर्व पत्रकारांनी सर्व अर्थाने सक्षम होणे आवश्यक आहे," असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांचे पदाधिकारी अधिवेशन शिर्डी येथे दिनांक 10 मार्च 2023 रोजी पार पडले. येथील हॉटेल शांती कमल भक्तनिवासच्या सभागृहात झालेल्या या पदाधिकारी अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे अध्यक्षस्थानी होते तर, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, तसेच केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी व राज्यातील सर्व कार्यकारणी सदस्य, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, व पदाधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला साईबाबा आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंचावरील मान्यवरांचे संघाच्या वतीने स्वागत सत्कार झाल्यानंतर राज्यभरातून आलेल्या जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
वर्षभरात विविध शाखांनी केलेल्या कामाचा आढावा जिल्ह्याध्यक्षांनी सादर केला. चांगले काम केलेल्या जिल्हाध्यक्षांचा, पत्रकारांना वैद्यकीय मदत मिळवून देणारे परभणीचे विजय कुलदिपके, कोरोना काळात लोकांना भरघोस मदत करणारे निलकंठ मोहिते, यांचा विशेष प्रोत्साहन पर सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकारांसाठी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सन्मान पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाठपुराव्यामुळे त्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करुन अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद केल्याबद्दल अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संघाच्या वतीने आभार मानले व धन्यवाद दिले.
या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सुत्रसंचलन अहमदनगर जिल्हा सचिव दत्ता गाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी केले. पत्रकार संघाच्या वतीने यावेळी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा