रविकांत तुपकरांच्या सहकाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
पिकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि सोयाबीन कापूस दरवाढीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात ११ फेब्रुवारी रोजी आंदोलन झाले होते. यावेळी पोलिसांनी तुपकरांसह २५ जणांवर गुन्हे दाखल करुन त्यांची कारागृहात रवानगी केली होती. तर आणखी दहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती, दरम्यान या दहा कार्यकर्त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनातील या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला होता. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलन चिघळले. रविकांत तुपकरांसह २५ जणांवर गंभीर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आल. दरम्यान या सर्वांचा जामीन मंजूर झाल्याने सहा दिवसानंतर त्यांची कारागृहातून सुटका झाली. जेलमधून बाहेर येताच रविकांत तुपकरांसह या सर्वांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत झाले.
त्यानंतर रविकांत तुपकर यांनी २१ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी केलेल्या अन्यायकारक कारवाईची माहिती दिली. हजार वेळा तुरुंगात टाकले तरी शेतकऱ्यांसाठीचा लढा सुरुच राहणार असे सांगत पुढील महिन्यात भव्य यात्रा काढणार असल्याची घोषणा तुपकरांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी आधी गुन्हे दाखल केलेल्या रविकांत तुपकरांसह इतर २५ जणांव्यतिरिक्त डॉ. ज्ञानेश्वर टाले, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दत्तात्रय जेऊघाले, आकाश माळोदे, प्रदीप शेळके, विजय बोराडे शेख अझर शेख अजाज, राऊफ लाला व भागवत सुसर या दहा कार्यकर्त्यांनाआरोपी बनवून त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. या दहा जणांनाही अटक केली जाणार होती. त्यामुळे हे कार्यकर्ते भूमिगत होते. त्यांच्यावतीने अॅड. शर्वरी तुपकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करुन न्यायालयासमोर जोरदार युक्तीवाद केला.
या आरोपींच्या विरोधात पोलिसांनी स्वतंत्र आणि ठराविक आरोप केलेले नव्हते. पोलिसांचे जे काही आरोप आहेत ते सर्व रविकांत तुपकर यांच्याविरोधात आहेत. त्यामुळे या 4 आंदोलकांना मोठा दिलासा रविकांत तुपकर यांचे आंदोलन हे शेतकरी हिताचे आंदोलन होते. तुपकर हे बऱ्याच काळापासून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत आहेत, त्यामुळे इतर आरोपींचा तपास करायचा म्हणून त्यांच्या साथीदारांना कस्टडीत ठेवणे गरजेचे नाही, असे मत न्यायालयाने नमुद करत या दहा आंदोलकांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहा जणांना कस्टडीमध्ये घेऊन चौकशी करण्याची फारशी गरज नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त करत या दहा जणांचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती. ॲड. शर्वरी तुपकर यांनी दिली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा