maharashtra day, workers day, shivshahi news,

सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष आणि योगदानामुळेच आज महिलांचा सर्वांगिण विकास -प्राचार्या डॉ. मीना गायकवाड

स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची जयंती साजरी

savitribai fule, jayannti, sveri, dr.b.p. ronge sir, shivshahi news, pandharpur,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर

‘आज सर्वच क्षेत्रात मुली कार्यरत आहेत. पूर्वी स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी नव्हती, स्वातंत्र्य नव्हते. आता स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. आजच्या विज्ञानयुगात व तंत्रशिक्षणात स्त्रिया चौफेर विकास साधत आहेत. अशा स्थितीत आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षणासोबतच विकासाची समान संधी आणि सुरक्षितता प्रदान करणे गरजेचे आहे. यासाठी सावित्रीबाईंच्या विचार आणि आचरण यांचे अनुकरण करण्याची गरज आहे. डॉ.आंबेडकरांनी महिला संबंधी कायदे लिहिले हे सर्वज्ञात असले तरी त्या बाबींचा अभ्यास करून महिलांनी न्याय मिळवण्यासाठीचे प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करणे ही खरी गरज आहे. पूर्वीच्या अनेक अनिष्ट रूढी, परंपरा ह्या स्त्रियांच्या शिक्षणामुळे लोप पावत आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. 

सुमारे पन्नास वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी कार्य केले. सावित्रीबाईंच्या कार्यामधून स्त्री स्वातंत्र्याची आणि त्यांच्या विकासासाठीची धडपड दिसत होती. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी पावलोपावली संघर्ष केला. सावित्रीबाईंनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात महिलांसाठी पहिली शाळा भरवली. आज त्या चळवळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यावेळी सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी हट्ट धरला. सुरुवातीला या हट्टाला विरोध झाला पण पुढे समाजाने ते स्वीकारले. म्हणून आज स्त्रिया परिपूर्ण शिक्षण घेत आहेत. त्यांच्या या अशक्यप्राय योगदानामुळे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आज स्वेरीमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त जाणवते. एकूणच सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष आणि योगदानामुळेच महिलांचा सर्वांगिण विकास होत आहे, हे मात्र निश्चित.’ असे प्रतिपादन जुळे सोलापूर येथील वसुंधरा कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीना गायकवाड यांनी केले.

                गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १९१ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे होते. प्रमुख पाहुण्या प्राचार्या डॉ. मीना गायकवाड यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्या डॉ. मीना गायकवाड यांचा डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी परिचय करून दिला तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या हस्ते स्वेरीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्या डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थीनींसाठी ‘ऑल्वेज बी अ पार्ट ऑफ सोल्युशन, नॉट टू बी अ पार्ट ऑफ प्रॉब्लेम’ हा संदेश दिला. 

स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना म्हणाले की, ‘नव्या युगाला घडविण्यासाठी ज्यांनी आपली उभी हयात खर्च करून आदर्श कार्य केले असे फुले दाम्पत्य हे आजच्या समाजासमोर असणारे दीपस्तंभ आहेत.’ पुढे बोलताना प्राचार्या डॉ. मीना गायकवाड म्हणाल्या की, ‘महिलांनी कायद्याचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करणे गरजेचे आहे, हीच मोठी शिकवण सावित्रीबाई फुलेंनी दिली.’ विद्यार्थीनी शोभा मेटकरी व प्रा. यशपाल खेडकर यांनी देखील क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्यावर भाष्य करून वर्तमान परिस्थितीचे दर्शन घडवले. अध्यक्षस्थानावरून बोलताना स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘प्राचार्या डॉ. मीना गायकवाड, डॉ. रोंगे सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानावर सुंदर विचार मांडले. 

यापूर्वी आम्ही गर्ल्स हॉस्टेलवर ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची जयंती साजरी करायचो पण आता ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार सर्व विद्यार्थीनींपर्यंत पोहचवण्यासाठी ओपन थिएटर मध्ये घेण्याचे ठरविले. एकूणच सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची जाणीव झाल्यावर चेतना जागृत होते.सर्वांनी नेहमी समाजाची जाणीव ठेवून कार्य केले पाहिजे.’ यावेळी माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज, प्राध्यापक वर्ग व स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमधील सर्व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अंकिता घंटे व प्राजक्ता कोराळे यांनी केले तर प्रा. यशपाल खेडकर यांनी आभार मानले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !