बंद पडलेल्या बसला दुचाकीची धडक लागून झाला होता भीषण अपघात
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव नरसी रोडवर टायर फुटल्याने बंद पडलेल्या एसटी बसला दुचाकीची धडक लागून अपघातात जखमी झालेले नामदेव पुंडलिकराव सोनटक्के यांचा मृत्यू झाला आहे दि.२० जानेवारी रोजी सायंकाळी ०७-३० ते ८ वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला होता.
या बाबत आमचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर यांनी सविस्तर वृत्त दिले आहे. दिनांक २० जानेवारी रोजी देगलूर आगाराची बस क्र. एम.एच.२० ई.एल.२४५४ हि टायर फुटल्याने बंद अवस्थेत रस्त्याच्या मध्ये उभी होती. यावेळी नामदेव पुंडलिकराव सोनटक्के हे आपल्या दुचाकीवरून नायगाव ते नरसीकडे जात असताना रोडवर मधोमध उभे असलेल्या बसला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली . या अपघातात दुचाकीवरील नामदेव पुंडलिकराव सोनटक्केजबर जखमी झाले होते.
विशेष म्हणजे अपघात झाला तेंव्हा सोनटक्के रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते तेव्हा बसचे चालक व वाहक गाडी मध्येच बसून होते, पण त्यांनी माणुसकीच्या नात्याने कोणतीच मदत केली नाही. तसेच महामंडळाच्या गाडीच्या पाठीमागे कोणतेही किट किंवा दगडही लावलेले नव्हते. असा सोनटक्केंच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. घटनेची माहिती घरी नातेवाईकांना कळाल्यानंतर एका तासानंतर नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नामदेव सोनटक्कें यांना दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर, लोटस हॉस्पिटल नांदेड येथे हलविण्यात आले. परंतु रात्री १०-४५ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा