वाहनधारकांना तर करावी लागते अक्षरशः कसरत
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिक सोनपसारे)
सिंदखेड राजा तालुक्यातील प्रति पंढरपूर असलेल्या वैष्णव गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. खड्डयामुळे रस्ता ओळखणे देखील कठीण झाले आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सावखेड फाटा ते वैष्णव गड या रस्त्यावरून वाहनासह पायी चालणेही माणसांना कठीण झाले आहे. त्यामुळे तत्काळ हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वैष्णव गडावर येणारे भाविक आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. सिंदखेड राजा जवळच असलेले वैष्णव गडला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते.
या ठिकाणी लाखों भाविक येतात. मात्र, सावखेड फाट्यापासून तीन किलोमीटर पर्यंत वैष्णव गड आहे. या तीन किलोमीटर रस्त्यामध्ये रस्ता कमी आणि खड्डेच जास्त आहेत. वाहन चालवताना वाहन चालकाला अक्षरशः मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावरून सावखेड फाट्यापासून पुढे वैष्णव गड आणि उगला या गावाकडे हा रस्ता जातो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच वैष्णव गडावर वर्षभर धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. वारकरी देखील दररोज मोठ्या प्रमाणात वैष्णव गडावर येतात. मात्र, रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याची संबंधितांनी दखल घेऊन तत्काळ रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी भाविकांकडून केल्या जात आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा