कुंटुर पोलीस ठाण्यात 9 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील बळेगाव येथे बेलकर कुटुंबात शेतीचा वाद असून या वादाचे परिणाम अखेर मारहाणीत झाले. या प्रकरणातील एकजण आजारी असलेल्या मामाला भेटायला जात असताना मोटारसायकल अडवून आई व मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली आहे. मारहाण करुन गंभीर दुखापत केल्या प्रकरणी बळेगाव येथील नागेश बेलकर यांच्यासह ९ लोकांच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात दि. ११ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील बळेगाव येथील परमेश्वर गोविंद बेलकर हे आपल्या आजारी असलेल्या मामांना भेटण्यासाठी आई जिजाबाई बेलकर यांना सोबत घेवून दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान रुई बु. येथे जात होते. काही अंतरावर बळेगाव शिवारातच एक काळ्या रंगाची स्कार्पीओ गाडी मोटारसायकल समोर आडवी लावून मोटारसायकल अडवली. गाडीतून नागेश दत्ता बेलकर, शिवाजी नागेश बेलकर, गुलाब माधव बेलकर, अशोक गणपती बेलकर, दिलीप माधवराव बेलकर, गजानन अशोकराव बेलकर, साईनाथ अशोक बेलकर व अविनाश पंडीत बेलकर अदिनी मोटारसायकलची चाबी काढून घेतली, परमेश्वर बेलकर व त्यांच्या आईला ढकलून दिले, त्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी जिजाबाई ह्या आरडाओरड करत होत्या त्यावेळी नागेश बेलकर यांनी डोक्याचे केस धरुन तोंडावर थापडा मारल्या.
आईला तर मारहाण करण्यात आलीच पण परमेश्वर बेलकर यासही लाथाबुक्यांनी, काठी लोंखडी राँडने हाता पायावर, मांडीवर मारहाण केली आणि उजवा पाय मोडण्याचा प्रयत्न केला. हा नेहमीच पोलीस ठाण्यात व कोर्टात अर्जबाजारी करत आहे असे म्हणून जबर मारहाण केली. यात परमेश्वर बेलकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदरची घटना दि. ६ जानेवारी रोजी घडली असली तरी या प्रकरणी दि.११ जानेवारी रोजी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची घटना शेतीच्या वादातून घडली असल्याचे गावकरी सांगत असून. हा प्रकार जाणूनबुजून करण्यात आला असल्याची चर्चा होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा