maharashtra day, workers day, shivshahi news,

सुगम्य भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार

दिव्यांग सक्षमीकरणासाठी वर्ष 2021-22 साठी राज्याला एकूण सात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

sugamya bharat abhiyan, maharashtra done best,  National Award, hon. President draupadi murmu, dilli, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नवी दिल्ली

दिव्यांगांनी, राज्य शासनाने तसेच गैरशासकीय संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष 2021-22 चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला सुगम्य भारत अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गौरविण्यात आले. यासह महाराष्ट्रातील चार दिव्यांग व्यक्ती, एक संस्था आणि अकोला जिल्हा पर‍िषदेला सन्मानित करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात ‘जागतिक दिव्यांग दिना’चे औचित्य साधून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2021-2022 चा राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रपती श्रीमती मुर्मू, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले, प्रतिमा भौमिक, केंद्रीय दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल मंचावर उपस्थित होते.

याकार्यक्रमात वर्ष 2021 साठी एकूण 25 राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील तीन दिव्यांग आणि अकोला जिल्हा परिषदचा समावेश आहे. तर वर्ष 2022 मध्ये एकूण 29 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाला सुगम्य भारत अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल, एक दिव्यांग आणि एक गैरशासकीय संस्थेचा समोवश आहे.

 

महाराष्ट्राने केली सुगम्य भारत अभियानाची प्रभावी अंमलबाजवणी
‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य ठरले असून हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांनी राज्याच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला. या अभियानातंर्गत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या चार शहरातील 137 इमारती सुगम्य करण्यात आलेल्या आहेत. याकरिता केंद्र शासनाकडून आतापर्यंत 2197.38 लाख रूपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. यासह या अभियानातंर्गत 24 संकेतस्थळे सुगम्य करण्यात आलेली आहेत. राज्यातील 29 % परिवहन सेवेतील वाहतूक साधने विशेषत: बस सुगम्य करण्यात आलेल्या आहेत. या केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी आज महाराष्ट्र शासनाला गौरविण्यात आले.

वर्ष 2022 साठी नागपूरचे उद्योजक जयसिंग चव्हाण यांना सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्तीच्या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री चव्हाण हे 87 % अस्थ‍िव्यंग आहेत. त्यांनी वित्त विषयात एमबीए केले आहे. रंजना ग्रुप ऑफ इंण्स्ट्री्स प्रा. ली. चे ते संचालक आहेत. त्यांनी आतापर्यंत 200 पेक्षा अध‍िक लोकांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी 2007 मध्ये त्यांना उत्कृष्ट दिव्यांग स्वयं उदयोजक या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 

औरंगाबादची महात्मा गांधी सेवा संघ संस्थेला दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणारी सर्वोत्कृष्ट संस्था या श्रेणीतील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ही संस्था 1994 मध्ये स्थापन करण्यात आली होती. या संस्थेव्दारे दिव्यांग व्यक्तींना आरोग्य सेवा, सामाजिक, शैक्षणिक व पूनर्वसनात्मक सेवा पुरविल्या जातात. या संस्थेने केंद्र तसेच राज्य शासनास धोरण तयार करण्यासाठी नॉलेज पार्टनर म्हणून कार्य केले जाते. आतापर्यंत 1 लाखाहून अधिक दिव्यांग वृद्धांना सहाय्यक साधने, उपकरणे वितरित करण्याचे काम संस्थेने केले आहे. यासोबत दिव्यांगाच्या शिबिरांचे आयोजन या संस्थेच्यावतीने करण्यात आलेले आहे.  

दिव्यांग अधिकार कायदा तसेच वैश्विक ओळखपत्र प्रणाली (UIDAI) तथा दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जिल्हा या श्रेणीतील पुरस्कार अकोला जिल्हा परिषदेला वर्ष 2021 साठी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कट‍ियार यांनी स्वीकारला. अकोला जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील दिव्यांगांची आरोग्य तपासणी व प्रमाणपत्र वाटप तसेच दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र कार्डाचे वाटप करण्याचा उपक्रम वर्ष 2021-22 मध्ये राबविण्यात आला आहे.

वर्ष 2021 साठी सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती श्रेणीतील पुरस्कार ठाणे जिल्ह्यातील अशोक भोईर यांना प्रदान करण्यात आला. श्री भोईर हे 75% अस्थ‍िव्यंग आहेत. श्री भोईर हे अंत्यत क्रियाशील व्यक्त‍िमत्व असून ते गोळा फेकणे आणि भाला फेकणे या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. त्यांनी दिव्यांगांसाठी स्वंयस्फुर्तपणे विविध संस्थेच्या माध्यमातून तसेच व्यक्त‍िगतर‍ित्या अनेकांना मदत केलेली आहे.  

पुण्याच्या असणा-या विमल पोपट गव्हाणे यांना श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती या श्रेणीतील पुरस्काराने आज राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या पुणे जिल्हयात तालुका हवेली पेरणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य कर्मचारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी कोविड महासाथी दरम्यान रूग्णांचे लसीकरणाच्या कामात वर‍िष्ठ वैद्यकीय अधिका-यांसोबत महत्वपूर्ण भुमिका बजावली. कुटूंब नियोजन, पल्स पोलिओ लसीकरण, 0 ते 16 वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण, यासह आरोग्य केंद्रातंर्गत राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्याच्या उपक्रमांमध्ये हिरह‍िरीने श्रीमती गव्हाणे यांचा सहभाग असतो.

पुण्याचे चे डॉ. शुभम धूत यांनाही श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती श्रेणीतील पुरस्काराने गौरवविण्यात आले. श्री धूत हे टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहेत. सात वर्षे संशोधन करून हेमोफिलिय ह्या दिव्यांग प्रवर्गातील आजारावर कायमस्वरूपी ‘रक्तामृत’ आयुर्वेद औषधाचा शोध त्यांनी लावला आहे. त्यांना यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

मुळ महाराष्ट्राचे असलेले डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांना संशोधन क्षेत्रातील पुरस्कार

मूळेच पुण्याचे डॉ भाऊसाहेब बोत्रे यांना संशोधन क्षेत्रातील दिव्यांग सक्षमीकरण पुरस्काराने आज गौरविण्यात आले. ते 100% गतिविषयक दिव्यांग आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये पीएचडी केलेली आहे. सध्या ते सीएसआईआर राजस्थान मध्ये मुख्य वैज्ञानिक या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना राज्यस्थान राज्याकडून पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. डॉ बोत्रे यांनी उतार रस्ते (inclined roads) उड्डानपुल, डोंगरी भागातून दिव्यांगांना चढ उतार करण्यासाठी इलेक्ट्रिकच्या सोबत हैंड पैडल यंत्र विकस‍ित केले आहे. यासह ई-अस‍िस्ट ट्राइ-साइकिल चे एक प्रोटोटाईप विकसित केले आहे. श्री बोत्रे यांच्या नावे दोन स्वामित्व ( पेटेंट), आणि कॉपी राईटच्या नोंदी आहेत.

पुरस्कार स्वरूपात प्रमाणपत्र, पदक आणि काही श्रेणींमध्ये रोख रकम प्रदान करण्यात आलेली आहे

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !