बुधवारी पंढरपुरात संत मंडळींच्या उपस्थितीत होणार पुरस्कार प्रदान सोहळा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
स्वा. सावरकर भक्त व सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार जाहीर. पंढरीत होणार भव्य सत्कार. सार्या महाराष्ट्रात प्रसिध्द असलेला, क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे ट्रस्टचा हिंदुत्व शौर्य पुरस्कार, यावेळी सुप्रसिध्द सिनेअभिनेते आणि , स्वा. सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक शरद पोंक्षे यांना प्रदान केला जाणार आहे.
येत्या बुधवार दिनांक ९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता पंढरीतील संत तुकाराम भवनामधे होणार्या भव्य कार्यक्रमात, ह. भ. प. जयवंत महाराज बोधलेंच्यासह विविध साधुसंतांच्या उपस्थितीमधे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सकल जनांनी उपस्थित रहावे. असे आवाहन ट्रस्टचे अभयसिंह इचगावकर, विवेक बेणारे, महेश खिस्ते, बाळाराव डिंगरे, अनिल पवार , डॉ. पाचकवडे यांनी केले आहे. क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने प्रतिवर्षी एका लढावु हिंदुत्वनिष्ठ नेत्या, कार्यकर्याला हा पुरस्कार विठ्ठलाचा आशिर्वाद रुपाने प्रदान केला जातो. ११ सहस्त्र रुपये रौख, मानपत्र, हार, श्रीफळ, शाल, आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या अगोदर राज्यातीलच नव्हे तर दुसर्या राज्यातील लढावू हिंदुत्वनिष्ठांना हा पुरस्कार दिला गेला आहे. यामधे प्रामुख्याने आवरण कादंबरीचे कन्नड लेखक एस्.एल. भैरप्पा, श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालीक, आपल्या लेखणीने हिंदुत्वाचा गजर करणारे दै. सनातन प्रभात, संतवीर बंडातात्या कराडकर, गोरक्षक मिलींद एकबोटे, साळूंखे, सुधाकर बहिरवाडे आदिंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी या पुरस्कारासाठी निवड मंडळाने शरद पोंक्षे यांची निवड केली आहे. शरद पोंक्षे मराठी, हिंदी चित्रपट,नाटक, दुरदर्शन मालीकांमधे गाजलेले नट आहेत. तसेच ते कट्टर स्वा. सावरकरांचे भक्त आणि सावरकर साहित्याचे अभ्यासकही आहेत. त्यांनी स्वा. सावरकरांच्या साहित्यावर राज्यभर व्याख्याने दिली आहेत. तर पंडित नथुराम गोडसे यांच्या जीवनावरील मी नथुराम गोडसे बोलतोय या प्रचंड गाजलेल्या नाटकात नथुराम गोडसेची भुमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली होती. यामुळे त्यांचेवर अनेकदा प्राणघातक हल्लेही झाले आहेत. पण याला न घाबरता त्यांनी देशभरातील नागरीकांसमोर हे नाटक सादर केले. नुकतेच त्यांनी आपल्या लढावू वृत्तीला साजेल असे एका शारीरिक व्याधीला यशस्वी टक्कर देवुन पुन्हा वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणेसाठी ते सज्ज झाले आहेत. या कार्यक्रमासाठी पंढरीतील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रयत्न करत असुन , पोंक्षेंच्या विचारांची मेजवानी पंढरपूरकरांना मिळणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा